आयपीएल २०२० चा ५१ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना मुंबईने ९ विकेट्सने जिंकला. या सामन्यात मुंबईचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टने शानदार गोलंदाजी केली. सोबतच फलंदाज इशान किशननेही चमकदार खेळी केली. मात्र किशनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने नाराजी व्यक्त करत हा चूकीचा निर्णय असल्याचे म्हटले.
नाणेफेक जिंकत मुंबईने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि दिल्ली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ९ विकेट्स गमावत केवळ ११० धावाच केल्या. या धावांचे आव्हान मुंबईने १ विकेट गमावत सहजरीत्या अवघ्या १४.२ षटकातच पूर्ण केले.
मुंबईकडून फलंदाजी करताना किशनने नाबाद सर्वाधिक ४७ चेंडूत ७२ धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ८ चौकार ठोकले. मुंबईच्या गोलंदाजीबाबत बोलायचं झालं, तर वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. या तीन खेळाडूंनी मुंबईसाठी धडाकेबाज कामगिरी केली.
बुमराहला सामनावीर पुरस्कार मिळायला पाहिजे होता- आशिष नेहरा
स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करत असलेला माजी गोलंदाज आशिष नेहराने मुंबई आणि दिल्ली सामन्यात मिळालेल्या सामनावीर पुरस्कारावर प्रश्न उपस्थित केले. या सामन्यात किशनला सामनावीर निवडले, परंतु नेहराच्या म्हणण्यानुसार हा पुरस्कार जसप्रीत बुमराहला मिळायला पाहिजे होता.
तो म्हणाला, “हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. एका सामन्यात विरुद्ध संघ केवळ ११० धावाच करतो. अशावेळीही तुम्ही फलंदाजाला सामनावीर पुरस्कार देत असाल, तर हे नक्कीच चुकीचं आहे. जसप्रीत बुमराहने ३ षटकात १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. असे असूनही त्याला सामनावीर पुरस्कार न मिळणे निराशादायी आहे. इशान किशनने चांगली खेळी केली. त्याबद्दल मी खुश आहे, परंतु बुमराहला पुरस्कार न मिळणे चुकीचे आहे.”
इरफान पठाणने बुमराह नाही तर बोल्टचे घेतले नाव
नेहरासोबत समालोचन करत असलेला माजी खेळाडू इरफान पठाणनेही म्हटले की, सामनावीर पुरस्कार गोलंदाजाला मिळायला पाहिजे होता. त्याने यावेळी जसप्रीत बुमराहचे नाव न घेता ट्रेंट बोल्टचे नाव घेतले. तो म्हणाला की, बोल्टला सामनावीर पुरस्कार मिळायला पाहिजे होता. बोल्टने ४ षटकात २१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-जसप्रीत बुमराहमुळे विराटला सुर गवसला?, पाहा काय आहे कारण
-जोफ्रा आर्चरने केली जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची हुबेहुब नक्कल; मजेशीर व्हिडिओ व्हायरल
-रोहित शर्माची आयपीएलमधून माघार? मुंबई इंडियन्सने दिली महत्त्वाची माहिती…
ट्रेंडिंग लेख-
-राजस्थानच्या ‘या’ ५ धुरंधरांची दमदार खेळी पडली पथ्यावर; ७ विकेट्सने पंजाब चितपट
-सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
-…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला