आज(19 डिसेंबर) कोलकाता येथे आयपीएल 2020साठीचा लिलाव रंगणार आहे. त्यामुळे सर्वच संघांनी या लिलावासाठी तयारी सुरु केली आहे. या लिलावाआधी आठही संघांनी त्यांचे काही खेळाडू मुक्त केले आहेत. त्यामुळे अनेक संघांमध्ये नवीन चेहेरे दिसण्याची शक्यता आहे.
यावर्षी आयपीएल लिलावासाठी 997 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यातील 332 खेळाडूंचीच अंतिम निवड करण्यात आली आहे. यात 186 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
अंतिम निवड झालेल्या 332 खेळाडूंपैकी 7 खेळाडूंच्या लिलावासाठी सर्वोच्च 2 कोटी ही मूळ किंमत ठेवण्यात आली आहे. हे सातही खेळाडू विदेशी आहेत. यात ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, डेल स्टेन, मिशेल मार्श, जोश हेजलवुड, अँजेलो मॅथ्यूज आणि ख्रिस लिन यांचा समावेश आहे.
भारतीयांमध्ये रॉबिन उथप्पाला सर्वाधिक 1.5 कोटी रुपये ही मुळ किंमत ठेवण्यात आली आहे. त्याच्यासह अजून 9 विदेशी खेळाडूंचीही हीच मुळ किंमत ठेवण्यात आली आहे. तर 23 खेळाडूंची 1 कोटी या मुळ किंमतीसाठी निवड झाली आहे.
तसेच निवड झालेल्या 332 खेळाडूंमध्ये 134 कॅप खेळाडूंचा (किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला खेळाडू) समावेश आहे. या खेळाडूंची मुळ किंमत 2 कोटी ते 50 लाखांपर्यंत आहे. तर 198 अनकॅप खेळाडूंची (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेला खेळाडू) निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंची मुळ किंमत 40 लाख ते 20 लाखापर्यंत आहे.
लिलावावेळी प्रथम कॅप(आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेले खेळाडू) आणि नंतर अनकॅप खेळाडूंचा लिलाव होईल. एकूणच, आयपीएल 2020 साठी सर्व संघांच्या मिळून 73 खेळाडूच्या रिक्त आहेत. यापैकी 29 जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.
त्यामुळे कोणता संघ कोणत्या खेळाडूला संघात घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आयपीएल 2020 लिलावाबद्दल सर्वकाही…
कधी होणार आहे 2020 आयपीएल लिलाव?
2020 आयपीएल लिलाव 19 डिसेंबर 2019 ला होणार आहे.
कुठे होणार आहे 2020 आयपीएल लिलाव?
2020 आयपीएल लिलाव कोलकाता, पश्चिम बंगाल येथे होणार आहे.
किती वाजता होणार आहे 2020 आयपीएल लिलाव?
2020 आयपीएल लिलाव 19 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहता येईल 2020 आयपीएल लिलाव?
2020 आयपीएल लिलाव स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येणार आहे.
2020 आयपीएल लिलाव ऑनलाइन कसा पाहता येईल?
2020 आयपीएल लिलाव हॉटस्टारवर(Hotstar) लाइव्ह पाहता येईल.






