अखेर तो दिवस उजाडला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे आज (मंगळवार, १० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी ७.३० वाजता आयपीएल २०२०ची अंतिम लढाई रंगणार आहे. रोहित शर्मा कर्णधार असलेल्या मुंबई इंडियन्सला पाचव्यांदा ट्रॉफी पटकावण्याची संधी आहे, तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचे लक्ष पहिल्यांदा ट्रॉफीवर नाव कोरत इतिहास रचण्यावर आहे.
आयपीएल २०२०च्या संपूर्ण हंगामात दिल्लीची गोलंदाजी फलंदाजीपेक्षा जास्त मजबूत असल्याचे दिसून आले आहे. अशात मुंबईच्या धाकड फलंदाजांना चित करण्यासाठी दिल्लीच्या गोलंदाजांना आज त्यांचा करिश्मा दाखवावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईकडे आठव्या क्रमांकापर्यंत उत्तमोत्तम फलंदाजी करणारे खेळाडू उपलब्ध आहेत. जे कोणत्याही संघाच्या गोलंदाजी फळीला विस्खळीत करु शकतात.
धवन आयपीएलमध्ये सलग २ शतके लगावणारा एकमेव खेळाडू
दिल्लीच्या फलंदाजीची जबाबदारी पूर्णपणे सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि कर्णधार अय्यरच्या खांद्यावर असेल. धवनने या हंगामात ५००पेक्षा जास्त धावांचा आकडा गाठला आहे. त्याच्याव्यतिरिक्त केवळ २ फलंदाजांना ५००पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील साखळी फेरीतील सलग २ सामन्यात २ शतके लगावली आहेत. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांविरुद्ध त्याला स्वत:ची विकेट वाचवून संघासाठी मोठी खेळी करावी लागणार आहे.
रबाडाने घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-३ गोलंदाजांमध्ये दिल्लीच्या कागिसो रबाडाचा समावेश आहे. हा वेगवान गोलंदाज १६ सामन्यातील २९ विकेट्ससह या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. दुसरीकडे मुंबईचा जसप्रीत बुमराह २७ विकेट्ससह आणि ट्रेट बोल्ट २२ विकेट्ससह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.
खेळपट्टीबद्दल माहिती आणि हवामान अहवाल
सामन्याच्या दरम्यान दुबईतील आकाश स्वच्छ राहील. तर तापमान २३-३२ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दुबईतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंनाही मदत होईल. नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. आयपीएलच्या या हंगामात दुबईच्या मैदानावर झालेल्या १५ सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयी सरासरी ६४% इतकी आहे.
दुबईच्या मैदानावरील आकडेवारी
या मैदानावर झालेले एकूण टी२० सामने: २५
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : १६
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय: ९
या हंगामात बनलेली सर्वाधिक सांघिक धावसंख्या : २१९
या हंगामात बनलेली सर्वात कमी सांघिक धावसंख्या: १०९
संघाची ब्रँड व्हॅल्यू आणि महागडे खेळाडू
मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू ८०९ कोटी आणि दिल्ली कॅपिटल्सची ३७४ कोटी इतकी आहे. खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, मुंबईच्या अंतिम ११ जणांच्या ताफ्यात रोहित शर्मा, हार्दिक पंड्या हे सर्वात महागडे खेळाडू आहेत. मुंबईने रोहितला १५ कोटी आणि हार्दिकला ११ कोटी रुपयांना विकत घेतले होते, तर दिल्ली संघात रिषभ पंत १५ कोटी आणि शिमरॉन हेटमायर ७.७५ कोटींसह सर्वात महागडे खेळाडू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
जट्ट जी डीआरएस घ्यायचा विसरलात का?, रिव्ह्यू न घेता धवन बाद झाल्यानंतर युवराजचे ट्विट
महान फलंदाज ब्रायन लाराने निवडलेल्या यादीत ‘या’ ६ युवा खेळाडूंना मिळाले स्थान
रबाडाने घेतल्या तीन चेंडूत तीन विकेट्स, तरीही हुकली हॅट्रिक; जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू