जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या आयोजनावर कोरोना व्हायरसचे संकट ओढवले आहे. या व्हायरसमुळे आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला आयपीएल 2020चा 13वा हंगाम 29 मार्चला होणार होता. परंतु, आता आयपीएल 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा (Corona Virus) धोका पाहता काल (14 मार्च) मुंबईमध्ये इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL2020) गव्हर्निंग काउंसिलची बैठक (Governing Council Meeting) पार पडली. यामध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले. कारण सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.
परंतु, बीसीसीआयही (BCCI) सरकारच्या सूचनेनुसार पुढील रणनीती तयार करेल. पत्रकारांशी बोलताना बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला (Sourav Ganguly) की, थोडा वेळ द्या. सर्वकाही स्पष्ट करण्यात येईल. परंतु जर आयपीएल खेळण्यात आले तर त्यात काही बदल करण्यात येतील.
आयपीएल 2020च्या 13व्या हंगामात हे बदल केले जाऊ शकतात-
-शनिवारी (14 मार्च) आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीदरम्यान अनेक पर्यायांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये आयपीएलचे सामने कमी केले जाऊ शकतात. तसेच एका दिवशी दोन सामनेही खेळवले जाऊ शकतात.
-आयपीएलमधील फ्रँचायझी संघांना 4-4च्या गटात विभागले जाऊ शकते. तसेच दोन गटांमधून अव्वल क्रमांकावरील दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील.
-या आयपीएलमध्ये डबल हेडर्सच्या (एका दिवशी दोन सामने) संख्येमध्ये वाढ केली जाऊ शकते. सध्या तरी पाच दिवस डबल हेडर्स होतात, जिथे दुपारी सामने खेळवले जातात. परंतु वेळापत्रक पुढे ढकलण्यात आल्यामुळे डबल हेडर्सच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.
-आयपीएलचे सामने हे ठरावीक मैदानावर घेण्यात येऊ शकतात. म्हणजेच प्रत्येक फ्रँचायझी संघाच्या घरच्या मैदानावर सामने घेण्याऐवजी ठरावीक स्टेडियममध्ये हे सामने घेण्यात येतील. जेणेकरून खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि टी.व्ही. क्रूला कमीत कमी प्रवास करता येईल.
-या आयपीएलमध्ये आणखी एका पर्यायाचा वापर करण्यात येऊ शकतो. तो असा की, सर्व 60 सामने रिकाम्या स्टेडियममध्ये कमी वेळात खेळवण्यात येतील. जेणेकरून आयपीएल भागधारकांचे आर्थिक नुकसानही होणार नाही.