दुबई येथे रविवारी (१ नोव्हेंबर) आयपीएल २०२० च्या ५४ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थान रॉयल्सवर ६० धावांनी विजय मिळवला. हा कोलकाताचा या हंगामातील सातवा विजय होता. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. या विजयाचा हीरो पॅट कमिन्स राहिला. त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोलकाताच्या विजयामुळे राजस्थान प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्स संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आणि कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने ७ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाने ९ विकेट्स गमावत केवळ १३१ धावाच केल्या.
राजस्थानकडून फलंदाजी करताना जॉस बटलरने सर्वाधिक धावांची खेळी केली. त्याने २२ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांचा सामना करत ३५ धावा कुटल्या. त्याच्यासोबतच राहुल तेवतिया (३१) आणि श्रेयस गोपाळने (२३) धावा केल्या. बेन स्टोक्सने चांगली फटकेबाजी केली. परंतु त्याला केवळ १८ धावाच करता आल्या. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
कोलकाता संघाकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकात ३४ धावा देत ४ विकेट्स आपल्या खिशात घातल्या. त्याच्यासोबतच शिवम मावी आणि वरुण चक्रवर्तीनेही धडाकेबाज कामगिरी करत प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर कमलेश नागरकोटीनेही १ विकेटवर आपली मोहोर लावली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताकडून कर्णधार ऑयन मॉर्गनने अविश्वसनीय खेळी केली. त्याने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६८ धावा ठोकल्या. त्याच्यासोबतच राहुल त्रिपाठी (३९), शुबमन गिल (३६) आणि आंद्रे रसेलने (२५) धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर फलंदाज २० धावांच्या आतच गारद झाले.
राजस्थान संघाकडून गोलंदाजी करताना राहुल तेवतियाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत ३ विकेट्स चटकावल्या. त्याच्यासोबतच कार्तिक त्यागीने २ विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी १ विकेट घेतली.
कोलकाताने विजय मिळवल्यानंतर ते गुणतालिकेत १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. त्यांचा रन रेट हा -०.२१४ इतका आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भावा कसं जमलं हे..! दिनेश कार्तिकने एकाच हाताने घेतला भन्नाट झेल; पाहा व्हिडिओ
-“तुझा आवडता हिंदी शब्द कोणता?”, स्टोक्सच्या बाउन्सरला आर्चरने दिलं भन्नाट उत्तर
-ज्या गोष्टीसाठी कॅप्टन्सी सोडली त्यातच फ्लॉप, माजी खेळाडूची दिनेश कार्तिकवर खोचक टीका
ट्रेंडिंग लेख-
-सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ
-एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
-IPL 2020: प्रतिभाशाली असूनही पंजाब संघाकडून एकाही सामन्यात संधी न मिळालेले ५ युवा क्रिकेटर्स