इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) २०२० चा मोसम संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये खेळला जाणार आहे. हा मोसम १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान होईल. याबद्दलची पुष्टी आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल पुढील आठवड्यात बैठक होईल. यामध्ये अंतिम वेळापत्रकाला मंजूरी दिली जाणार आहे.
पटेल पीटीआयशी बोलताना म्हणाले, ‘गव्हर्निंग कौन्सिलची लवकरच बैठक होईल, पण आम्ही वेळापत्रक ठरवले आहे. आयपीएल १९ सप्टेंबरपासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत होईल. यासाठी आम्हाला सरकारची मंजूरी मिळेल अशी आशा आहे. हा संपूर्ण ५१ दिवसांचा आयपीएल मोसम असेल.’
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पटेल म्हणाले की कोविड-१९ चा धोका टाळण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार केले जात आहे आणि बीसीसीआय अधिकृतपणे युएई क्रिकेट बोर्डाला पत्र लिहील.
तसेच पटेल यांनी असेही सांगितले की ‘प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहू द्यायचे की नाही याचा निर्णय युएई सरकारवर अवलंबून आहे. हा निर्णय आम्ही त्यांच्या सरकारवर सोडला आहे. तरीही सोशल डिस्टसिंगचे पालन करावे लागेल. आम्ही अधिकृतरित्या युएई बोर्डाला पत्र लिहू.’
सर्व संघ २० ऑगस्टला आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी युएईमध्ये पोहचण्याची शक्यता आहे.
युएईमध्ये दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथे तीन प्रमुख मैदाने आहेत. याआधीही २०१४ ला आयपीएलचे २० सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. आयपीएल२०२०चा हा मोसम याआधी एप्रिल-मेमध्ये होणार होता. परंतू कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. तसेच भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे ११ लाखांहूनही अधिक आहेत. तसेच अनेक गोष्टींवर सध्या बंधने आहेत. अशा परिस्थितीत भारतात आयपीएलचे आयोजन करणे धोक्याचे ठरले असते. त्यामुळे आयपीएल भारतातून युएईमध्ये हलवले आहे.