आयपीएलच्या या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने खेळलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. संघाचा अनुभवी गोलंदाज डेल स्टेन चांगल्या फॉर्ममध्ये नाही, हा या संघासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र युवा फिरकीपटू युझवेंद्र चहल उत्कृष्ट कामगिरी करतोय.
चहलने आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. विराट कोहली हा नेहमीच गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवतो, असे पत्रकार परिषदेत बोलताना चहल म्हणाला होता.
विराटबद्दल बोलताना तो म्हणाला, “विराट भैय्या नेहमीच गोलंदाजांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. तो नेहमीच आपल्या गोलंदाजांना सांगतो की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोलंदाजी करा. तुम्ही तुमच्या गोलंदाजीचे स्वतः कर्णधार आहात. तो गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाची सजावट करण्यासाठी स्वातंत्र्य देतो. मी 6 वर्षांपासून बेंगलोरकडून खेळत आहे आणि विराट भैय्या नेहमीच आत्मविश्वासाने भरलेला असतो. त्याचा असा विश्वास आहे की जर तुम्ही प्रथम गोलंदाजी केली आणि जर यश आले नाही तर आपण प्लॅन बी अंमलात आणू आणि इतर गोलंदाजांना संधी देऊ. एक गोलंदाज आणि युवा खेळाडू म्हणून तुम्हाला असाच कर्णधार हवा असतो.”
या स्पर्धेत चहलने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 5 गोलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश आहे. त्याने पहिल्या 3 सामन्यात 5 बळी घेतले आहेत. शनिवारी (3 ऑक्टोबर) राजस्थान विरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसेल.