---Advertisement---

CSK vs SRH: ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईचा हैदराबादवर ७ विकेट्सने मोठा विजय

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 11:02 PM
---Advertisement---

दिल्ली। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने ७ विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १७१ धावा केल्या आणि चेन्नईला १७२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठला चेन्नईने १८.३ षटकात ३ विकेट्स गमावत यशस्वी पूर्ण केला.

हैदराबादने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईकडून सलामीला फलंदाजीसाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस उतरले. त्यांनी चेन्नईला दमदार सुरुवात दिली. या दोघांनीही शतकी भागीदारी करताना वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. या दोघांनीही १२ षटकांपर्यंत हैदराबादच्या गोलंदाजांना विकेट मिळू दिली नव्हती.

मात्र, अखेर आक्रमक खेळ करत असलेला ऋतुराज १३ व्या षटकात राशिद खान विरुद्ध खेळताना त्रिफळाचीत झाला. त्यामुळे त्याची फाफ डू प्लेसिसबरोबरील शतकी भागीदारी तुटली. त्यांच्यात १२९ धावांची भागीदारी झाली. ऋतुराज ४४ चेंडूत १२ चौकारांसह ७५ धावांवर बाद झाला.

ऋतुराजनंतर मोईन अली १५ व्या षटकात राशिद खानच्या गोलंदाजीवर १५ धावा करुन बाद झाला. त्याला राशिद खानने बाद केले. राशिदने त्याच्या पुढच्याच चेंडूवर फाफ डू प्लेसिसला पायचीत केले. फाफ डू प्लेसिस १५ व्या षटकात ३८ चेंडूत ५६ धावांवर बाद झाला. या खेळीत फाफ डू प्लेसिसने ६ चौकार आणि १ षटकार मारला.

अखेर सुरेश रैना आणि रविंद्र जडेजाने उर्वरित आव्हान पूर्ण करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रैना १७ धावांवर आणि जडेजा ७ धावांवर नाबाद राहिला.

हैदराबादकडून केवळ राशिद खानलाच विकेट्स घेण्यात यश आले. चेन्नईच्या सर्व ३ विकेट्स त्यानेच घेतल्या.

वॉर्नर, पांडेचे अर्धशतक

हैदराबादकडून डेव्हि़ड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो सलामीला फलंदाजीसाठी आले. मात्र, बेअरस्टो चौथ्या षटकात सॅम करनच्या गोलंदाजीवर केवळ ७ धावा करुन बाद झाला. यानंतर मात्र, वॉर्नरने मनिष पांडेच्या साथीने १७ व्या षटकापर्यंत चेन्नईच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. या दोघांनी १०६ धावांची भागीदारी केली. दरम्यान, दोघांनी वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. विशेष म्हणजे या खेळी दरम्यान वॉर्नरने टी२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला. तसेच तो आयपीएलमध्ये ५० अर्धशतके करणारा पहिला क्रिकेटपटूही ठरला.

अखेर वॉर्नर आणि पांडेची जोडी लुंगी एन्गिडीने १८ व्या षटकात वॉर्नरला बाद करत तोडली. वॉर्नर ५५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा करुन बाद झाला. त्याच षटकात मनिष पांडे देखील बाद झाला. त्याने ४६ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला.

अखेर केन विलियम्सनने केदार जाधवसह आक्रमक खेळ करत हैदराबादला २० षटकांच्या अखेर १७१ धावांपर्यंत पोहचवले. २० षटकांअखेर विलियम्सन १० चेंडूत २६ धावांवर नाबाद राहिला. तर केदार ४ चेंडूत १२ धावांवर नाबाद राहिला.

चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने २ विकेट्स घेतल्या, तर सॅम करनने १ विकेट घेतली.

हैदराबादने जिंकली नाणेफेक 

या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपल्या ११ जणांच्या संघात प्रत्येकी २ बदल केले आहेत. चेन्नईच्या संघात मोईन अली आणि लुंगी एन्गिडीचे इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्रावोच्या जागेवर पुनरागमन झाले आहे. तर हैदराबाद संघात मनीष पांडे आणि संदीप शर्मा यांनी अभिषेक शर्मा आणि विराट सिंग ऐवजी पुनरागमन केले आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ 

सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विलियम्सन, मनीष पांडे, केदार जाधव, विजय शंकर, रशीद खान, जगदीशा सुचित, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल.

चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी, दीपक चाहर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---