---Advertisement---

DCvsKKR : पृथ्वी शॉच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा कोलकाताला ७ विकेट्सने पराभवाचा धक्का

On: गुरूवार, एप्रिल 29, 2021 10:57 PM
---Advertisement---

अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात २५ वा सामना गुरुवारी (२९ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात कोलकाताने दिल्लीसमोर १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान दिल्लीने १६.३ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

कोलकाताच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या दिल्लीच्या सलामवीरांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम फोडला. पृथ्वी शॉने शिवम मावीच्या पहिल्याच षटकात तब्बर २४ धावा कुटत कोलकाताच्या मनसुब्यावर पाणी फेरले. तसेच पुढे जात आयपीएल २०२१ मधील सर्वाधिक जलद अर्धशतक देखील साकारले.

पृथ्वी शॉला शिखर धवनने देखील उत्तम साथ देत कोलकाताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यामुळे दिल्लीने एकही विकेट न गामवता १२ षटकात तब्बल ११३ धावा ठोकत, सामना आपल्या ताब्यात घेतल्याचे दिसले.

पण अखेर १४ व्या षटकात ४६ धावांवर शिखर धवनला पॅट कमिन्सने पायचीत केले. तर १६ व्या षटकात शॉ ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांवर आणि कर्णधार रिषभ पंत शुन्यावर कमिन्सविरुद्ध खेळतानाच बाद झाले. पण तोपर्यंत दिल्ली विजयाच्या जवळ पोहचली होती. अखेर स्टॉयनिसने १७ व्या षटकात चौकारासह दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १५४ धावा केल्या. कोलकाताकडून शुभमन गील आणि आंद्रे रसेल यांनी सर्वाधिक अनुक्रमे ४३ आणि ४५ धावा केल्या. या व्यतिरिक्त कोलकाताचे इतर फलंदाज मात्र स्वस्तात परतले.

दिल्लीकडून अक्षर पटेल, अनेश खान आणि ललीत यादव यांनी चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करत कोलकाताच्या धावसंख्येला ब्रेक लावला. अक्षर आणि ललीत यांनी प्रत्येकी २-२  विकेट्स घेतल्या.

दिल्ली आणि कोलकाताचे ११ जणांचे संघ –

या सामन्यासाठी दिल्लीने अंतिम ११ जणांच्या संघात अमित मिश्राऐवजी ललित यादवला संधी दिली आहे. अमितला खांद्याची दुखापत झाली आहे. तर कोलकाताने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

दिल्ली कॅपिटलस- पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, ललित यादव, कागिसो रबाडा, इशांत शर्मा, अवेश खान.

कोलकाता नाइट रायडर्स – शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, सुनील नारायण, ओएन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---