मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४ तारखेला आयपीएल २०२१ हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने २९ सामन्यांनंतर हा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण आता या हंगामातील उर्वरित ३१ सामने खेळवण्याचे आव्हान बीसीसीआय समोर उभे आहे. तरी असे वृत्त समोर येत आहे की सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान हा उर्वरित हंगाम युएईमध्ये पार पडू शकतो.
स्पोर्ट्स टूडेने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलचा उर्वरित १४ वा हंगाम १९ किंवा २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये खेळवला जाऊ शकतो. या दरम्यान ९ किंवा १० डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) खेळवण्यात येऊ शकतात तसेच ४ दिवस प्ले-ऑफची फेरी खेळवली जाऊ शकते. दरम्यान, याबद्दल अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा १४ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे खेळाडू आधीपासूनच बायोबबलमध्ये असल्याने त्यांना इंग्लंडमधील बायोबबलमधून थेट युएईमधील आयपीएल संघांच्या बायोबबलमध्ये हलवले जाऊ शकते. दरम्यान, इंग्लंड दौरा संपल्यानंतर १५ किंवा १६ ला भारतीय खेळाडू दुबईला पोहचतील आणि ३ दिवस क्वारंटाईन होतील. त्यानंतर ते आयपीएलमधील सामने खेळण्यास तयार होऊ शकतात.
याबरोबरच याचदरम्यान कॅरेबियन प्रीमीयर लीगही होत असल्याने त्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती केली जाऊ शकते. तरी आता जर सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आयपीएलचा उर्वरित १४ वा हंगाम खेळवायचा झाल्यास अन्य राष्ट्रीय संघांच्या क्रिकेट बोर्डाशीही बीसीसीआयला चर्चा करावी लागेल. पण हा हंगाम युएईमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
तरी, सर्वच गोष्टींचा विचार करुन बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने यापूर्वीच सांगितले आहे की जर आयपीएल २०२१ हंगाम पूर्ण झाला नाही तर जवळपास २५०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
आयपीएलचा १३ वा हंगाम झाला होता युएईमध्ये
मागीलवर्षी कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण आयपीएल २०२० हंगाम युएईमध्येच सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात आला होता. तसेच त्यापूर्वी भारतातील निवडणूकांमुळे २०१४ सालच्या आयपीएल हंगामातील काही सामनेही युएईमध्ये खेळवण्यात आले होते. त्यामुळे आता उर्वरित १४ वा हंगामही येथेच खेळवला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या ‘या’ खेळाडूंकडे आहे चिक्कार पैसा, तरीही करतात सरकारी नोकरी; काही नावं ओळखीची
‘रोहित एक दिग्गज आहे, तुझा तो दर्जा नाही’, पाकिस्तानी गोलंदाजांला ‘या’ क्रिकेटरने दाखवली पात्रता