मंगळवारी (५ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या ५१ व्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये लढत झाली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ८ विकेट्स आणि ७० चेंडू राखून मोठा विजय मिळवला. मुंबई इंडियन्ससाठी या संपूर्ण हंगामात खूपच खराब फॉर्मममध्ये दिसलेल्या ईशान किशनने कालल्या सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने राजस्थानविरुद्ध खेळताना २५ चेंडूत ५० धावांची खेळी केली. सामना संपल्यानंतर त्याने त्याच्या प्रदर्शनाबाबत काही दिग्गज खेळाडूंसोबत चर्चा केल्याचे स्पष्ट केले आहे.
खराब फॉर्ममध्ये होता ईशान
ईशान किशनने आयपीएल २०२० मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आगामी टी २० विश्वचषकात त्याला भारतीय संघात सामील केले गेले आहे. मागच्या हंगामात ईशानने १४ सामन्यांमध्ये ५७.३३ च्या सरासरीने ५१६ धावा केल्या होत्या. मात्र, चालू हंगामात त्याचे प्रदर्शन खूपच खराब पाहायला मिळाले. या हंगामात त्याने १३.२७ च्या सरासरीने १०७ धावा केल्या होत्या. मात्र, कालच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेली अर्धशतकी खेळी महत्वाची ठरली आहे. या सामन्यात केलेल्या अर्धशतकानंतर त्याच्यावर होणाऱ्या टीका कौतुकात बदलल्या आहेत.
या दिग्गजांना दिले श्रेय
सामना संपल्यानंतर ईशान आनंदी दिसला आणि या सामन्यापूर्वी विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्डसोबत चर्चा केल्याचे त्याने स्पष्ट केले. त्यांच्यासोबत चर्चा केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचे त्याने म्हटले. सामन्यानंतर तो म्हणाला की, “फॉर्ममध्ये चढउतार हा खेळाचा भाग आहे. मी विराट भाई, हार्दिक आणि पोलार्डसोबत चर्चा केली. मला आता पुढच्या सामन्यात हीच लय कायम ठेवायची आहे.”
मुंबईचा राजस्थानवर मोठा विजय
दरम्यान, मुंबई आणि राजस्थान संघात झालेल्या सामन्यात राजस्थानला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने ७० चेंडू शिल्लक ठेवून सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला मुंबईने नाणेफेक जिंकली आणि प्रथम राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. राजस्थानने २० षटकात ९ विकेट्स गमावून अवघ्या ९० धावा केल्या. प्रत्यत्तरात मुंबई इंडियन्सने ८.२ षटकांमध्ये केवळ दोन विकेट्स गमावल्या आणि विजयी लक्ष्य गाठले.