आयपीएलचा तेरावा हंगाम २०२० साली सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत युएईत पार पडला. त्यानंतर पुढील हंगामाची तयारी आता बीसीसीआयने सुरु केली आहे. हा हंगाम येत्या एप्रिल-मे महिन्यात भारतातच खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. या हंगामासाठी काल सगळ्या संघांनी कायम ठेवलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.
या यादीनंतर कोलकाता संघाचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मॅक्युलमने येत्या हंगामात कोलकाताचा संघ आपले सर्वोत्तम प्रदर्शन करेल, असा विश्वास व्यक्त केला. कोलकाताने या हंगामासाठी आपल्या मुख्य खेळाडूंना कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर केल्यानंतर मॅक्युलमने ट्विटरवरून ही प्रतिक्रिया दिली.
आपल्या ट्विटमध्ये मॅक्युलम म्हणाला, “आमच्या बहुतांश मुख्य खेळाडूंना आगामी आयपीएल हंगामासाठी कायम राखू शकल्याने आम्ही समाधानी आहोत. आम्ही मागील वेळी देखील फार दूर नव्हतो आणि यावर्षी देखील आम्ही अतिशय कडवी लढत देऊ, यावर माझा विश्वास आहे. मागील हंगामातील ज्या खेळाडूंना करारमुक्त केले आहे, त्या सगळ्यांनी आत्तापर्यंत दिलेल्या योगदानासाठी आम्ही आभारी आहोत. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने कायम राखलेल्या खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारायण, इयॉन मॉर्गन (कर्णधार), पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
त्याचवेळी त्यांनी ५ खेळाडूंना करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यात एम सिद्धार्थ, निखिल नाईक, सिद्धेश लाड, ख्रिस ग्रिन, टॉम बंटन यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
स्पायडर-पंत! आयसीसीने रिषभचा शेअर केलेला तो गमतीशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल






