आयपीएल २०२१ हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. या सामन्यांसाठी भारतासह जगभरातील चाहते वाट पाहत आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघातील सामन्याने होणार आहे. आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा, जो भारतात खेळला गेला होता, यामध्ये २९ सामने खेळले झाले होते. आता हंगामातील उर्वरित ३१ सामने दुसऱ्या टप्प्यात यूएईमध्ये खेळेले जाणार आहेत.
भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि स्पर्धेदरम्यान काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला झालेली कोरोनाची लागण, या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२१ चा हंगाम आर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. आता उर्वरित हंगामाचे पुन्हा आयोजन करण्यात आले असून याचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे आणि सनसायझर्स हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यादरम्यान काही फलंदाजांनी चांगले प्रदर्शन करत सर्वाधिक धावा केल्या आहेत. या लेखात आपण या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत.
१. शिखर धवन
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात शिखर धवन सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तो दिल्ली कॅपिटल्स संघासाठी सलामीला फलंदाजी करतो आणि त्याने पहिल्या टप्प्यातील ८ सामन्यांमध्ये ३८० धावा केल्या आहेत. या धावा त्याने १३४.२७ च्या स्ट्राइक रेटने बनवल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतकं केली आणि सर्वाधिक ९२ धावा केल्या आहेत.
२. केएल राहुल
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात केएल राहुल दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तो पंजाब किंग्जचा कर्णधार असून त्याने खेळलेल्या सात डावांमध्ये ६६.२० च्या सरासरीने ३३१ धावा केल्या आहेत. त्याने यामध्ये सर्वाधिक नाबाद ९१ धावांची खेळी केली आहे. त्याच्या या कामगिरीत चार अर्धशतकांचाही समावेश आहे.
३. फाफ डु प्लेसिस
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने पहिल्या टप्प्यात खेळलेल्या ७ डावांमध्ये ६४ च्या सरासरीने ३२० धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याने पहिल्या टप्प्यात सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली आहे.
४. पृथ्वी शाॅ
पृथ्वी शाॅने ८ डावांमध्ये ३०८ धावा करत आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. त्याने ३८.५० च्या सरासरीने आणि १६६ च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात त्याने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली आहे. त्याच्या या कामगिरीमध्ये तीन अर्धशतकांचाही समावेश आहे.
५. संजू सॅमसन
संजू सॅमसन सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. तो आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान राॅयल्सचा कर्णधार असून त्याने पहिल्या टप्प्यातील ७ डावात ४६.१६ च्या सरासरीने २७७ धावा केल्या आहेत. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध सुरुवातीच्या सामन्यात शतकही झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ज्यादाचा वनडे किंवा टी२० सामना खेळण्यास तयार, पण मुद्दा हा नाही, तर…’, गांगुलीचे मोठे भाष्य
पीसीबीच्या अध्यक्षपदी निवड होताच रमीज राजा यांचा मोठा निर्णय, क्रिकेटपटूंच्या वेतनात २५० पटींनी वाढ