---Advertisement---

‘ज्यादाचा वनडे किंवा टी२० सामना खेळण्यास तयार, पण मुद्दा हा नाही, तर…’, गांगुलीचे मोठे भाष्य

On: मंगळवार, सप्टेंबर 14, 2021 10:49 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर १० ते १४ सप्टेंबरदरम्यान कसोटी मालिकेतील पाचवा सामना होणार होता. मात्र, कोरोनाचा भारतीय संघाच्या गोटात प्रवेश झाल्याने भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला. त्यामुळे हा सामना सुरु होण्याआधीच रद्द करावा लागला. मात्र, भारतीय संघ ४ सामन्यांनंतर मालिकेत २-१ ने आघाडीवर असूनही निकाल प्रलंबित ठेवण्यात आला आहे. याबद्दल बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आयसीसीला पत्र लिहून वादविवाद निवारण समितीकडून (डीआरसी) निर्णयाची मागणी केली आहे. आयसीसीने अजूनतरी याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

रद्द झालेल्या सामन्याबद्दल गांगुली पीटीआयशी बोलताना म्हणाला, ‘आमची इच्छा आहे की ही मालिका पूर्ण व्हावी. कारण २००७ नंतर इंग्लंडमध्ये हा आमचा पहिला मालिका विजय असेल. बीसीसीआयचे मत आहे की कसोटी क्रिकेट प्रमुख प्रकार असून त्याबाबत कोणत्याही स्थितीत तडजोड होऊ नये.’

इंग्लंड विरुद्ध भारत संघात कसोटी मालिका सुरु असताना भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मँचेस्टर कसोटी खेळण्यास नकार दिला.

जर या सामन्याला ‘रद्द सामना’ श्रेणीत ठेवले गेले, तर ईसीबीला ४ कोटी पौउंडची विमा रक्कम मिळेल. तसेच जर आयसीसीला असे वाटत असेल की या सामन्याचे आयोजन कोविड-१९ कारणामुळे झाले नाही, तर भारत अधिकृतपणे २-१ ने मालिका जिंकेल. तसेच अशा प्रकारे सामने रद्द करणे कोविडशी संबंधित जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या नियमांनुसार स्वीकार्य मानले जाते.

त्याचबरोबर गेल्या काही दिवसात असेही वृत्त समोर येत आहे की जेव्हा पुढील वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल, तेव्हा इंग्लंड विरुद्ध ज्यादाचे २ टी२० सामने खेळवले जातील. ज्यामुळे रद्द झालेल्या मँचेस्टर कसोटीची भरपाई होऊ शकेल. भारताचा संघ पुढीलवर्षी ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जून-जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे.

याबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, ‘आम्ही ज्यादाचा वनडे किंवा टी२० सामना खेळण्यास तयार आहोत, पण मुद्दा हा नाही, तर इतकेच आहे की नंतर जो कसोटी सामना खेळला जाईल, तो मालिकेतील पाचवा सामना असावा.’

भारताचा माजी कर्णधार गांगुली पुढे म्हणाला, ‘गेल्या १८ महिन्यांत कोविड-१९ मुळे मालिका रद्द करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. बीसीसीआयने गेल्यावर्षी मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द केली होती. ज्यामुळे आम्हाला ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले होते.’

गांगुलीच्या म्हणण्यानुसार भविष्यात अशा परिस्थितीत ठोस वैद्यकीय सल्ला असावा, जेणेकरून संघामध्ये कोविडची प्रकरणे आढळली, तरीही मालिका सुरू ठेवता येईल. तो म्हणाला, ‘आम्ही जाणतो की प्रेक्षकांसाठी आणि टेलिव्हिजन दर्शकांसाठी हे किती नुकसानदायक आहे, विशेषत: तेव्हा, जेव्हा मालिका इतक्या रोमांचक वळणावर होती. कसोटी क्रिकेट बीसीसीआयसाठी पहिले प्राधान्य असेल.’

याशिवाय गांगुली असेही म्हणाला की एका मर्यादेपलीकडे खेळाडूंवर दबाव टाकला जाऊ शकत नाही. तो म्हणाला, ‘मालिका मध्येच संपल्याने आम्ही निराश आहोत. यामागचे एकमेव कारण कोविड-१९ चे संक्रमण आणि खेळाडूंची सुरक्षा हे होते. आम्ही एका मर्यादेपर्यंतच त्यांना सक्ती करु शकतो. ही महामारी इतकी वाईट आहे की कोणीही एका मर्यादेच्या पुढे जाऊ शकत नाही.’

त्याचबरोबर जेव्हा गांगुलीला विचारण्यात आले की काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन दुसऱ्या खेळाडूंसह सामना होऊ शकला असता का, तेव्हा गांगुली म्हणाला, ‘हा पर्याय नव्हता, कारण फिजिओ योगेश परमार यांच्या संपर्कात सर्व खेळाडू होते. त्यामुळे नक्कीच हे एक चिंतेचे कारण होते. ही गोष्ट अशी आहे की त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील होते.’

आता या कसोटीसंदर्भात आयसीसी काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पीसीबीच्या अध्यक्षपदी निवड होताच रमीज राजा यांचा मोठा निर्णय, क्रिकेटपटूंच्या वेतनात २५० पटींनी वाढ

‘दुबईला लवकर यावे लागणे दुर्भाग्यपूर्ण, पण…’ मँचेस्टर कसोटी रद्द होण्याबद्दल विराटने सोडले मौन

तपश्चर्या आली फळाला! अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सूर्यकुमारची टीम इंडियात दिमाखात एन्ट्री, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---