भारतीय फलंदाज मनीष पांडे मागच्या काही काळापासून खराब फाॅर्ममध्ये दिसत आहे. तो आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा भाग असून त्याला संघाने अनेकदा संधी दिल्या आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी (२५ स्पेटंबर) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यातही तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.
पंजाब आणि हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात पंजाबने अवघ्या पाच धावांनी विजय मिळवला. हैदराबादच्या फलंदाजीवेळी मनीष पांडे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता, पण त्याने चाहत्यांना पुन्हा एकदा निराश केले. त्याने फलंदाजी करताना १३ चेंडूंचा सामना करत २३ धावा करून बाद झाला आणि पव्हेलियनमध्ये परतला. पंजाबच्या रवी बिश्नोईने त्याला क्लीन बोल्ड केले. रवीने या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या.
संघाने सतत संधी देऊनही मनीष अपयशी
तसेच आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात यापूर्वी २२ सप्टेंबरला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातही मनीष पांडे काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने या सामन्यात १७ धावा केल्या आणि विकेट गमावली. संघ व्यवस्थापन त्याला सतत संधी देत आहे, पण मनीषला त्याचा घायदा घेता येत नाहीये. त्याच्या आयपीएल कारकिर्दीसाठी अशाप्रकारचे प्रदर्शन धोक्याची घंटा आहे.
आयपीएलच्या चालू हंगामात मनीषचे प्रदर्शन असमाधानकारक
दरम्यान, मनीषने आयपीएलच्या या चालू हंगामामध्ये सात सामने खेळले आहेत. यामध्ये ३७.१६ च्या सरासरीने आणि ११४.३५ च्या सरासरीने २२३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ अर्धशकांचाही समावेश आहे. असे असले, तरीही संघाला आणि चाहत्यांना त्याच्याकडून आणखी चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
आगामी टी- २० विश्वचषकासाठीही नाही मिळाली संधी
मनीषने भारताच्या राष्ट्रीय संघातील जागा आधीच गमावली आहे, आणि तो जर असेच प्रदर्शन करत राहिला, तर आयपीएमधील त्याचे भविष्यही अंधारात जाण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये जास्त काळापर्यंत खेळत राहण्यासाठी त्याला सुधारणा करणे आवश्यक आहे. आगामी टी- २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली. या संघातही त्याला संधी दिली गेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-ज्याने पंजाबच्या तोंडून हिसकावला असता सामना, त्याच खेळाडूचे कर्णधार राहुलने गायले खूप गुणगान
-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!
-क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?