रविवार रोजी (२६ सप्टेंबर) मकॉय येथे ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघात तिसरा वनडे सामना पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात शेवटी भारतीय संघाने ३ चेंडू राखून २ विकेट्सने हा सामना खिशात घातला. या सामन्यात भारतीय संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. तिने दमदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, सोबतच ऐतिहासिक विक्रमाचीही नोंद केली आहे.
तिने या सामन्याच्या नवव्या षटकात ऑस्ट्रेलिया संघाला २ मोठे झटके दिले. या २ विकेट्ससह तिने क्रिकेट कारकिर्दीतील ६०० विकेट्सचा आकडा पार केला आहे. तिचा हा विक्रम एकप्रकारे तिच्या टिकाकारांसाठी प्रत्युत्तरच ठरला आहे.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित ५० षटकात ९ विकेट्स गमावत २६४ धावा केल्या. दरम्यान भारताकडून गोलंदाजी करताना ३८ वर्षीय झुलनने नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर रचेल हायनेस हिला शेफाली वर्माच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे हायनेस १३ धावांवर पव्हेलियनला परतली. त्यानंतर त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर तिने नुकत्याच फलंजाजीसाठी आलेल्या मेग लॅनिंगला शून्य धावांवर झेलबाद केले. ती रिचा घोषच्या हातून झेलबाद झाली.
या २ विकेट्सनंतर तिने खालच्या फळीत ऍनाबेल सदरलँडलाही बाद केले. अशाप्रकारे पूर्ण डावादरम्यान ३७ धावांवर तिने ३ विकेट्स घेतल्या. यासह तिने क्रिकेट कारकिर्दीतील (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय) ६०० विकेट्सचा आकडा गाठला आहे. यामध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमदील जवळपास ३३७ विकेट्सचा समावेश आहे.
https://twitter.com/BCCIWomen/status/1441925642195402755?s=20
२००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या झुलनने आतापर्यंत १९२ वनडे सामन्यात सर्वाधिक २४० विकेट्स घेतल्या आहेत. तर तर ६८ टी२० सामन्यात ५६ विकेट्स आणि ११ कसोटी सामन्यात ४१ विकेट्सची कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिच्या नावे २६४ विकेट्सची नोंद आहे.
https://twitter.com/cricketcomau/status/1441931735667593216?s=20
महत्त्वाची बाब म्हणजे, याच झुलनला मागील दुसऱ्या वनडे सामन्यात अंतिम षटकातील २ नो बॉलमुळे टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तिने केलेले हे पुनरागमन कौतुकास्पद आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१: पहिल्या डबल हेडरनंतर गुणतालिकेत ‘मोठा’ फेरबदल, रोहितची मुंबई टॉप-५ मधून बाहेर
सनरायझर्सवर ओढवली सर्वात पहिल्यांदा प्लेऑफमधून बाहेर होण्याची नामुष्की, कर्णधारानेही व्यक्त केली खंत
सीएसके अन् केकेआर येणार आमने सामने; ‘अशी’ असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन






