आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वाच्या सुरूवातीला आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. आयपीएलचा यावर्षीचा हंगाम भारतात आयोजित केला होता. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा हंगाम अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. आता हंगामातील उर्वरित सामन्यांचे यूएईत आयोजन केले गेले आहे. यूएईमध्ये आयपीएलची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी स्पर्धेतील संघ यूएईत दाखल व्हायला सुरूवात झाली असून मुंबईच्या संघाने त्यांचा यूएईमधील विलगीकरणाची कालावधी पर केला आहे. त्यानंतर मुंबईचा संघ अबु धाबीच्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूलमध्ये व्हॉलीबॉल खेळताना दिसला आहे.
मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून खेळाडूंचा स्विमिंग पूलमधील व्हिडिओ शेयर केला आहे. संघाने इंस्टाग्राम खात्यावरून व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “क्वारंटाइन संपल्यानंतर स्विमिंग पूल व्हॉलीबॉल खेळण्यासाठी गोता लावताना.” या व्हिडिओत इशान किशन आणि धवल कुलकर्णी यांच्यासह इतरही खेळाडूंची झलक चाहत्यांना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CSyT3Bijxz7/?utm_source=ig_web_button_share_sheet
यूएईत आयपीएलचा पहिला सामना १९ सप्टेंबरला खेळला जाणार असून या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ भिडणार आहेत. पहिला सामना दुबईमध्ये खेळला जाईल. आयपीएलच्या मागच्या हंगामाचा विजेता संघ मुंबई इंडियन्सची नजर यावर्षीही विजेतेपदावर असणार आहे. या हंगामातील गुणतालिकेचा विचार केला तर ,मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर आहे. चालू हंगामातील दुसऱ्या टप्प्यात संघ त्यांच्या प्रदर्शनात सुधार करण्यावर लक्ष केंद्रित करेल.
मुंबई इंडियन्सचे काही प्रमुख खेळाडू संघासोबत अजून सहभागी झाले नाहीत. संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव. जसप्रीत बुमराह हे भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत. कसोटी मालिका संपल्यानंतर ते मुंबई इंडियन्ससोबत सामील होतील. कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट हे दिग्गजही येत्या आठवड्यात संघासोबत सामील होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रगीताला न थांबणाऱ्या महान क्रिकेटरची कॉलर पकडणारा डाव्या हाताचा ऑस्ट्रेलियाचा लक्ष्मण