सोमवारी (३ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) ५० सामने पूर्ण झाले. सोमवारपासून आयपीएलच्या साखळी सामन्यांचा अखेरचा आठवडा सुरू झाला. या अखेरच्या आठवड्याच्या सुरुवातीलानंतर आता केवळ सहा सामने शिल्लक आहेत. तत्पूर्वी, कोणत्या संघाची सध्या काय स्थिती आहे याबाबत आपण जाणून घेऊया.
तीन संघ प्ले ऑफसाठी पात्र
आयपीएल २०२१ मध्ये ५० सामन्यांनंतर प्ले ऑफचे चित्र काहीसे स्पष्ट होताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांनी शनिवारीच प्ले ऑफमधील आपली जागा निश्चित केली होती. त्यानंतर, रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पंजाब किंग्सचा सहा धावांनी पराभव करत प्ले ऑफमध्ये जाणारा तिसरा संघ होण्याचा मान मिळवला. सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईला पराभूत करत, अव्वल २ मधील आपली जागा निश्चित केली. चेन्नईने आपल्या अखेरच्या सामन्यात पराभव स्वीकारल्यास व बेंगलोरने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळविण्यास दिल्ली व बेंगलोर यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन संधी मिळतील.
एका स्थानासाठी जोरदार चुरस
तीन संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरल्याने व सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेतून बाहेर पडल्याने प्ले ऑफमधील एका जागेसाठी कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स सॅमसंग भिडतील. मंगळवारी (५ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यानंतर याबाबतचे चित्र आणखी स्पष्ट होईल. सध्या कोलकाता १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे तर, इतर तीन संघांचे प्रत्येकी १० गुण आहेत. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई आणि राजस्थानला आपल्या उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावे लागतील. विशेष म्हणजे राजस्थानचे दोन्ही सामने मुंबई व कोलकता यांच्याविरुद्धच आहेत. तसेच, मुंबई आपला अखेरचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळेल. कोलकाताने राजस्थानला पराभूत केल्यास ते चांगल्या रनरेटच्या जोरावर प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरतील.
पंजाबचे स्पर्धेतील आव्हान काहीअंशी संपुष्टात आले असले तरी, चेन्नई विरुद्धचा आपला अखेरचा सामना जिंकून इतर संघांच्या कामगिरीकडे त्यांना लक्ष द्यावे लागेल. कारण, इतर तीन पैकी एक संघ १२ गुणांवरच अडकले तर, रनरेटचा विचार करून चौथा संघ प्ले ऑफ गाठेल.






