आयपीएल 2021 ला सुरूवात होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले असून बीसीसीआयने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला जाहीर झालेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये आयपीएलच्या 14 व्या सत्राचा पहिला सामना होणार आहे.
नेहमीप्रमाणे या आयपीएलमध्ये सर्व संघांतील दिग्गज खेळाडूंव्यतिरिक्त काही राखीव खेळाडू दिसणार आहेत. तर आज आपण या राखीव खेळाडूंचा एक उत्कृष्ट अकरा खेळाडूंचा संघ तयार करून त्याबद्दल चर्चा करणार आहोत. विशेष म्हणजे या संघात परदेशी खेळाडू देखील असतील.
सलामीवीर
मनन वोहरा- 27 वर्षीय फलंदाज मनन वोहराने 2011 मध्ये चंदीगड पंजाबकडून घरगुती क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आपल्या दहा वर्षांच्या घरगुती क्रिकेट कारकीर्दीत त्याने पंजाब, हरियाणा आणि त्यानंतर चंदीगडच्या संघासाठी क्रिकेट खेळले आहे. आयपीएल 2021 मध्ये राजस्थान संघाने त्याला आपल्या समवेत घेतले आहे. परंतु राजस्थान संघाकडे अन्य सलामीवीर उपलब्ध असल्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागू शकते.
सुयेश प्रभुदेसाई- सुयेश प्रभुदेसाईने 2012 मध्ये गोव्याकडून घरगुती टी-20 क्रिकेट खेळताना आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. या युवा फलंदाजाने त्याच्या कारकीर्दीत एकूण 17 टी-20 सामने खेळताना 32.45 च्या सरासरीने 357 धावा केल्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघान लिलावात विकत घेतले आहे. पण आरसीबीमध्ये सर्व महान फलंदाज असल्याने या तरुण फलंदाजला संधी मिळणे जरा अवघडच आहे.
मधली फळी
सौरभ तिवारी- झारखंडच्या 31 वर्षीय ज्येष्ठ फलंदाज सौरभ तिवारीने 2007 मध्ये आपल्या टी-20 क्रिकेट कारकीर्दीला सुरूवात केली. त्याने आतापर्यंत एकूण 166 देशांतर्गत टी-20 सामने खेळले आहेत. आयपीएल 2021 मध्ये तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार असला तरी या संघातही फलंदाजीचा क्रम आधीच निश्चित झाला असल्याने त्याला संधी मिळणे अवघड आहे.
टिम सिफर्ट- 26 वर्षीय विकेटकीपर-फलंदाज टिम सिफर्टने 2018 मध्ये न्यूझीलंड संघाकडून आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्याने त्याच्या कारकीर्दीमध्ये एकूण 35 सामने खेळताना 24.82 च्या सरासरीने 695 धावा केल्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये तो केकेआरच्या ताफ्यात असला; तरी शुभमन गिल आणि नितीश राणा सारख्या सलामी फलंदाजांमुळे त्याला संघातून बाहेर बसावे लागेल.
रजत पाटीदार- इंदोरचा 27 वर्षीय फलंदाज रजत पाटीदार हा मागील 3 वर्षांपासून आपल्या राज्यातील स्थानिक क्रिकेट संघासाठी टी-20 क्रिकेट खेळत आहे. यामध्ये त्याने 22 सामने खेळताना 34.95 च्या उत्कृष्ट सरासरीने 699 धावा केल्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये आरसीबी संघाने त्याला विकत घेतले आहे. परंतु ग्लेन मॅक्सवेल सारख्या दिग्गज फलंदाजांची मधल्या फळीत हजेरी असल्याने त्याला संघात बाहेर रहावे लागू शकते.
लियाम लिविंगस्टोन- इंग्लंडचा 27 वर्षीय फलंदाज लियाम लिविंगस्टोन इंग्लडसंघासाठी फक्त दोनच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. परंतु 5 वर्षांच्या घरगुती क्रिकेट कारकीर्दीत त्याने 128 सामने खेळले आहेत आणि या सामन्यांमध्ये या फलंदाजाने 27.48 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये त्याला राजस्थान संघाने विकत घेतले आहे. मात्र या हंगामात त्याला खेळायची संधी मिळणे अवघड आहे.
अनुज रावत- उत्तराखंडच्या रामनगरमधील 21 वर्षीय युवा यष्टीरक्षक फलंदाज अनुज रावतने आतापर्यंत 20 घरगुती टी -20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 30.36 च्या सरासरीने 334 धावा केल्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये राजस्थान संघाने त्याला विकत घेतले आहे. परंतु संजू सॅमसन आणि जोस बटलर यांसारखे यष्टिरक्षक-फलंदाज असल्याने त्याला संधी मिळणे कठिण आहे.
अष्टपैलू खेळाडू
ललित यादव- दिल्ली कॅपिटल संघाचा 24 वर्षीय अष्टपैलू खेळाडू ललित यादवने 2018 मध्ये घरगुती टी -20 क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर दिल्लीकडून 35 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही उत्कृष्ट केली आहे. पण दिल्ली कॅपिटल्स संघात भारतीय आणि विदेशी अष्टपैलू खेळाडूंच्या उपस्थितीमुळे त्याला संधी मिळणे अवघड आहे.
गोलंदाज
मिचेल सँटनर- मिचल सँटनर या हॅमिल्टनच्या 29 वर्षीय फिरकी गोलंदाजाने 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध मॅनचेस्टर येथे न्यूझीलंडसाठी पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 5 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 52 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 60 बळी घेतले आहेत.आयपीएल 2021 मध्ये त्याला चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले आहे. परंतु मोईन अलीसारख्या दिग्गज खेळाडूमुळे या युवा गोलंदाजाला संघा बाहेर बसावे लागू शकते.
मार्को जेन्सन- दक्षिण आफ्रिकेच्या 20 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने आपल्या 2 वर्षांच्या छोट्या क्रिकेट कारकीर्दीत सर्वांना प्रभावित केले आहे. आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला आपल्यासोबत जोडले आहे. परंतु संघात अगोदरपासूनच अनुभवी वेगवान गोलंदाज असल्यामुळे त्याला संघात स्थान मिळणे कठीणच आहे.
पृथ्वीराज- आंध्र प्रदेशमधील 23 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज पृथ्वीराजने 2019 मध्ये आपल्या राज्यातील स्थानिक क्रिकेट संघासाठी घरगुती टी-20 क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यामध्ये त्याने केवळ 3 देशांतर्गत टी-20 सामने खेळतानी त्याने 4 बळी घेतले आहेत. आयपीएल 2021 मध्ये तो हैदराबाद संघाशी निगडीत आहे पण टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या वेगवान गोलंदाजांमुळे आयपीएल 2021 मध्ये त्याला संघात स्थान मिळणे अवघड जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: तू स्टंपवर का चेंडू टाकतोय, आधीच विरोधक बॅकफूटवर आहेत; होल्डरची भर सामन्यात स्लेजिंग
आयपीएल ट्रायलसाठी बारावी बोर्डाची परिक्षा सोडली; आता भल्याभल्यांना आपल्या फिरकीने करतोय गारद
प्रत्येकाने मंदिरातील घंटा समजून ‘पंत’ची वाजवली; भारतीय दिग्गजाचा कडवट आठवणींना उजाळा