शुक्रवारी (२४ सप्टेंबरला) झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके( आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यातील सामन्याच चेन्नईने विजय मिळवला.यासह चेन्नईने आयपीएलच्या गुणतालिकेत पुन्हा एकदा पहिले स्थान गाठले आहे. चला तर आयपीएल २०२१ चे ३५ सामने खेळले गेल्यानंतर कोणता संघ कितव्या स्थानावर आहे याची माहिती घेऊया.
चेन्नईने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत १४ गुणांसह पहिले स्थान गाठले आहे. चेन्नईच्या या सामन्यातील विजयानंतर दिल्ली कॅपिटल्स एका क्रमांकाने खाली सरकला आहे आणि सध्या दुसऱ्या स्थानावर आला आहे. तसेच चेन्नईविरुद्ध पराभव मिळाल्यानंतर आरसीबी संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांनी ९-९ सामने खेळले असून यातील प्रत्येकी सात सामने जिंकले आहेत. तसेच आरसीबीने ९ सामने खेळले असून त्यातील पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. चौथ्या क्रमांकावर केकेआर, पाचव्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स व गतविजेते मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानी आहेत. या तिन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकले असून, त्यांच्या खात्यावर प्रत्येकी आठ गुण जमा आहेत.
गुणतालिकेत सर्वात तळातल्या संघांचा विचार केला तर, आठव्या स्थानावर सनरायझर्स हौदराबाद आणि सातव्या स्थानावर पंजाब किंग्ज हे दोन संघ आहेत. सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत आठ सामने खेळले असून, केवळ एका सामन्यात विजय मिळवून ते केवळ दोन गुणांसह संघ गुणतालिकेत सर्वात तळाला आहे. तसेच, पंजाब किंग्जने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि संघ सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
तत्पूर्वी आयपीएल २०२१ चा हंगाम भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि स्पर्धेदरम्यान काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना झालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे अर्ध्यात स्थगित करण्यात आला होता. मात्र, आता हा हंगाम पुन्हा यूएईमध्ये आयोजीत करण्यात आला आहे. यूएईमध्ये आयोजित उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयने कोविड १९ संसर्ग टाळण्यासाठी कडक नियम लादले आहेत.