चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला आजपासून (९ एप्रिल) सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात बेंगलोरने शेवटच्या चेंडूवर २ विकेट्सने विजय मिळवला आहे. बेंगलोरच्या या विजयामुळे मुंबईची गेल्या ८ वर्षातील पहिल्या सामन्यातील पराभवाची मालिका मात्र, कायम राहिली आहे. मुंबईने २०१३ पासून आत्तापर्यंत एकाही हंगामात त्यांचा पहिला सामना जिंकलेला नाही.
मुंबईने बेंगलोरला १६० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून वॉशिंग्टन सुंदर आणि कर्णधार विराट कोहली सलामीला उतरले. या दोघांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, सुंदरला कृणाल पंड्याने १० धावांवर बाद केले. त्यानंतर नवखा रजत पाटिदारला ट्रेंट बोल्टने ८ धावांवर त्रिफळाचीत केले. पण यानंतर विराट आणि ग्लेन मॅक्सवेल यांची जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचली.
अखेर जसप्रीत बुमराहने विराटला १३ व्या षटकात ३३ धावांवर पायचित केले आणि ही भागीदारी तोडली. त्यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेलही २८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा करुन बाद झाला. त्यापाठोपाठ शहाबाज अहमद (१), डॅन ख्रिस्टियन (१) हे देखील स्वस्तात माघारी परतले. तर काईल जेमिसन १९ व्या षटकात ४ धावांवर धावबाद झाला. अशा एका बाजूने विकेट जात असताना एबी डिविलियर्सने मात्र आक्रमक खेळत दुसरी बाजू भक्कम सांभाळत विजयाचा विश्वास कायम ठेवला होता.
पण, अखेरच्या षटकात तो देखील २७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा करुन धावबाद झाला. तो बाद झाल्यानंतर अखेरच्या चेंडूवर बेंगलोरला १ धावेची गरज होती. ही विजयी धाव हर्षल पटेलने घेतली.
मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्ट आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी १ विकेट घेतली.
मुंबईचे बेंगलोरला १६० धावांचे आव्हान
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १५९ धावा करत बेंगलोरला १६० धावांचे आव्हान दिले आहे. बेंगलोरच्या हर्षल पटेल या सामन्यांत चमकला. त्याने ५ विकेट्स घेतल्या.
हर्षलच्या ५ विकेट्स
मुंबईने १३ षटकांच्या आतच १०० धावांचा आकडा पार केला होता. मात्र, त्यानंतर मुंबईच्या नियमित कालांतराने विकेट्स गेल्या. हार्दिक पंड्या आणि इशान किशनला हर्षल पटेलने त्याच्या वैयक्तिक लागोपाठच्या २ षटकात पायचीत केले. हार्दिक १३ धावांवर बाद झाला तर किशन २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर २० व्या षटकापर्यंत मुंबईने १५० धावांचा टप्पा पार केला. मात्र, २० व्या षटकाच्या पहिल्या २ चेंडूवर हर्षल पटेलने कृणाल पंड्या आणि किरॉन पोलार्डला लागोपाठ बाद केले. तर याच षटकात चौथ्या चेंडूवर मार्को जेन्सनला त्याने त्रिफळाचीत केले. यासह हर्षलने या सामन्यात ४ षटकांत २७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.
लिनचे हुकले अर्धशतक
मुंबईकडून ख्रिस लिन आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र, डावाच्या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर लिनने एक फटका खेळला. त्यावर एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहित १९ धावांवर धावबाद झाला. यानंतर सुर्यकुमार यादव फलंदाजीला आला. त्याने आक्रमक खेळणाऱ्या लिनला चांगली साथ दिली होती. या दोघांनी ७० धावांची भागीदारी केली होती.
ही भागीदारी रंगत असतानाच जेमीसनने ११ व्या षटकात सुर्यकुमार यादवला यष्टीरक्षक एबी डिविलियर्स करवी झेलबाद केले. सुर्यकुमार २३ चेंडूत ३१ धावा करुन बाद झाला. त्यापाठोपाठ काही वेळातच ४९ धावांवर खेळत असताना लिनने १३ व्या षटकात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू वर उडाला. यावेळी त्याचा झेल या षटकात गोलंदाजी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरनेच पकडला. त्यामुळे लिनचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले. लिनने त्याच्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार मारला.
तो बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी आला. त्याच्याबरोबर इशान किशन फलंदाजी करत आहे. मुंबईने १३ षटकात ३ बाद १०५ धावा केल्या.
बेंगलोरने जिंकली नाणेफेक
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी मुंबईने ख्रिस लिन आणि मार्को जेन्सन यांना अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे. हे दोघेही मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करत आहे. तसेच बेंगलोरने नुकत्याच कोविड-१९ या आजारातून बऱ्या झालेल्या देवदत्त पडीक्कलला आराम दिला आहे. त्यांच्याकडून रजत पाटिदार पदार्पण करत आहे. त्याचबरोबर या सामन्यासाठी बेंगलोरने ग्लेन मॅक्सवेल, काईल जेमीसन आणि डॅन ख्रिस्टियनलाही संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली (कर्णधार), रजत पाटिदार, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल ख्रिस्टियन, वॉशिंग्टन सुंदर, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चाहर, मार्को जेन्सन, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह






