---Advertisement---

RR vs DC : डेव्हिड मिलरच्या झुंजार अर्धशतकानंतर मॉरिसच्या वादळी खेळीमुळे राजस्थानचा दिल्लीला ३ विकेट्सने धोबीपछाड

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 11:23 PM
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील सातवा सामना गुरुवारी (१५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ३ विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीने राजस्थानला १४८ धावांचे आव्हान दिले होते. राजस्थानने हे आव्हान २ चेंडू बाकी ठेवत ७ विकेट्सच्या मोबदल्यात यशस्वी पूर्ण केले. राजस्थानच्या या विजयात डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिसने मोलाचा वाटा उचलला.

मिलर, मॉरीसची कमाल

राजस्थानने १० षटकांच्या आतच ५ विकेट्स गमावल्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातियाने राजस्थानचा डाव सावरला. त्यांनी ४८ धावांची भागीदारी केली. त्यामुळे राजस्थानने सामन्यात पुनरागमन केले. पण ही भागीदारी रंगत असतानाच तेवतियाला कागिसो रबाडाने १९ धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक केल्यानंतर काहीवेळात मिलरला आवेश खानने बाद केले. मिलरने ४३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. त्याच्या या अर्धशतकामुळे राजस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

त्याच्यानंतर ख्रिस मॉरिसने आक्रमक खेळत १८ चेंडूत ४ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी करत अखेर राजस्थानला विजय मिळवून दिला. मॉरिसला जयदेव उनाडकटने १ षटकारासह नाबाद ११ धावा करत चांगली साथ दिली.

दिल्लीकडून आवेश खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच कागिसो रबाडा आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

राजस्थानच्या १० षटकांत ५ विकेट्स

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी राजस्थानकडून मनन वोहरा आणि जोस बटलर हे सलामीला फलंदाजीला उतरले. मात्र, या दोघांनाही तिसऱ्या षटकात ख्रिस वोक्सने बाद करत राजस्थानला दुहेरी धक्का दिला. वोहरा ९ धावावंर आणि बटलर २ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ चौथ्या षटकात कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर पहिल्या सामन्यात शतकी खेळी केलेला राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यावेळी केवळ ४ धावा करुन झेलबाद झाला. त्याचा झेल शिखर धवनने घेतला.

त्यानंतर शिवम दुबेला २ धावांवर ८ व्या षटकात तर १० व्या षटकात रियान परागला २ धावांवरच आवेश खानने बाद करत राजस्थानची आवस्था आणखी दयनीय केली.

दिल्लीचे राजस्थानला १४८ धावांचे आव्हान

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४७ धावा केल्या आणि राजस्थानला १४८ धावांचे आव्हान दिले.

पंत बाद झाल्यानंतर दिल्लीच्या तळातील फलंदाजांनीही नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. ललित यादव १५ व्या षटकांत २० धावा करुन ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर टॉम करन आणि ख्रिस वोक्सने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण २८ धावांची भागीदारी झाल्यानंतर करन २१ धावांवर १९ व्या षटकात मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आर अश्विनने ७ धावा करुन धावबाद झाला. अखेर वोक्सने नाबाद १५ आणि कागिसो रबाडाने नाबाद ९ धावा करत दिल्लीला १४८ धावांपर्यंत पोहचवले.

राजस्थानकडून गोलंदाजी करताना जयदेव उनाडकटने ४ षटकांत १५ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मुस्तफिजूरने २ विकेट्स घेतल्या आणि ख्रिस मॉरिसने १ विकेट घेतली.

उनाडकटची शानदार गोलंदाजी; पंतचे झुंजार अर्धशतक

दिल्लीकडून सलामीला पृथ्वी शॉ आणि शिखर धवन उतरले. पण जयदेव उनाडकटने शॉला दुसऱ्याच षटकात २ धावांवर बाद केले. त्यानंतर शिखर चांगला खेळेल असे वाटत असतानाच तोही उनाडकटच्या गोलंदाजीवर चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक सॅमसनने घेतला. शिखरला ११ चेंडूत ९ धावांवर बाद होऊन माघारी परतावे लागले.

उनाडकटने शॉ आणि शिखर यांना बाद केल्यानंतर ६ व्या षटकात अजिंक्य रहाणेलाही बाद केले. रहाणे ८ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ मार्कस स्टॉयनिस हा मुस्तफिजूर रेहमानच्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झाला.

यानंतर मात्र, नवख्या ललित यादवने कर्णधार पंतला चांगली साथ देताना दिल्लीचा डाव सावरण्यास मदत केली. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. दरम्यान, पंतने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतकानंतर तो जास्तवेळ टिकू शकला नाही. तो १३ व्या षटकात एकेरी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. रियान परागने पंत क्रिजमध्ये परतण्याआधीच थेट स्टंपवर चेंडू मारत त्याला धावबाद केले. पंत ३२ चेंडूत ९ चौकारांसह ५१ धावा करुन बाद झाला.

राजस्थानने जिंकली नाणेफेक 

या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांचा या हंगामातील हा दुसरा सामना आहे. गुरुवारीच्या सामन्याचे आकर्षण दोन्ही संघांचे कर्णधार आहेत. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत या हंगामात पहिल्यांचा नेतृत्व करताना दिसत आहेत. तसेच हे दोघेही नवखे कर्णधार असून आपल्या संघांसाठी यष्टीरक्षक फलंदाजाचीही भूमीका निभावतात.

तसेच या सामन्यासाठी राजस्थानने दुखापतीमुळे आयपीएल २०२१मधून बाहेर पडलेल्या बेन स्टोक्सऐवजी डेव्हिड मिलरला अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिले. तर श्रेयस गोपाळ ऐवजी जयदेव उनाडकटलाही राजस्थानच्या ११ जणांमध्ये संधी मिळाली. दिल्लीने हेटमेयरच्या जागेवर कागिसो रबाडाला संधी दिली. याशिवाय दिल्लीकडून ललित यादव पदार्पण केले.

असे आहेत ११ जणांचे संघ –

राजस्थान रॉयल्स – मनन वोहरा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), डेव्हिड मिलर, जोस बटलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन सकारिया, जयदेव उनाडकट, मुस्तफिजुर रहमान.

दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत(यष्टीरक्षक/कर्णधार), अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वॉक्स, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, कागिसो रबाडा, टॉम करन, अवेश खान.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---