दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघामध्ये आयपीएलचा सामना खेळवला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात हैद्राबादला राजस्थानने मात दिली. राजस्थानने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना हैद्राबादला २० षटकात ८ बाद १६५ धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानने ५५ धावांनी विजय मिळवला. यासह गुणतालिकेत देखील त्यांनी पाचवे स्थान पटकावले.
राजस्थानच्या गोलंदाजांचा शिस्तबद्ध मारा
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी २२१ धावांचा बचाव करतांना शिस्तबद्ध मारा केला. त्यांनी नियमित अंतराने विकेट्स घेतल्याने हैद्राबादच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही. त्यांच्याकडून सलामीला आलेल्या मनीष पांडेने सर्वाधिक ३१ तर जॉनी बेअरिस्टोने ३० धावांची खेळी केली. राजस्थानकडून मुस्तफिझुर रहमान आणि ख्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
जोस बटलरचे तुफानी शतक
इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा २८ वा सामना आज (०२ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे होत असलेल्या या सामन्यात हैदराबाद संघाचा नवा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे राजस्थानने जोस बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ३ बाद २२० धावा करत हैदराबादला २२१ धावांचे आव्हान दिले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानकडून सलामीला जोस बटलर आणि यशस्वी जैयस्वाल उतरले. या दोघांनी चांगली सुरुवात केली. मात्र, जैयस्वाल १२ धावा करुन राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने बटलरची भक्कम साथ दिली. या दोघांनी मिळून राजस्थानला १५० धावांचा टप्पा पार करुन दिला. या दोघांमध्ये दिडशे धावांची भागीदारी रंगली असतानाच १७ व्या षटकात विजय शंकरने संजू सॅमसनला ४८ धावांवर बाद केले.
पण तरीही बटलर त्याच लयीत खेळत होता. त्याने १७ व्या षटकात ५६ चेंडूत शतकी खेळी केली. आयपीएलमध्ये शतक करणारा तो चौथा इंग्लंडचा खेळाडू ठरला. यापूर्वी केविन पीटरसन, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या तीन इंग्लंडच्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये शतके केली आहेत.
तो शतकानंतरही आक्रमक खेळत होता. पण अखेर १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माने त्याला त्रिफळाचीत केले. पण तोपर्यंत राजस्थानने २०० धावांचा टप्पा ओलांडला होता. बटलरने ६४ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांसह १२४ धावांची खेळी केली. अखेर रियान पराग आणि डेव्हिड मिलरने राजस्थानला २२० धावांपर्यंत पोहचवले.
असे आहेत ११ जणांचे संघ
याबरोबरच हैदराबाद संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन प्रमुख बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद नबी आणि भुवनेश्वर कुमार यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे. याबरोबरच युवा क्रिकेटपटू अब्दुल समदलाही निवडण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, नुकताच नेतृत्तवपदावरुन हटवण्यात आलेला डेविड वॉर्नर या सामन्यातून बाहेर झाला आहे. तसेच सिद्धार्थ कौल आणि जगदीश सुचिथ यांनाही बाकावर बसवण्यात आले आहे.
याबरोबरच राजस्थान संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. जयदेव उनाडकटला बाहेर करत कार्तिक त्यागीला अंतिम ११ जणांमध्ये जागा देण्यात आली आहे. याबरोबरच शिवम दुबेला वगळत अनुज रावतची निवड करण्यात आली आहे. या सामन्याद्वारे रावतचे आयपीएल पदार्पण होणार आहे.
#SRH have won the toss and they will bowl first against #RR
Follow the game here –https://t.co/oGFXokMmUq #RRvSRH #VIVOIPL pic.twitter.com/1AIp5snfkC
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2021
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन
जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, अनुज रावत, रियान पराग, डेविड मिलर, ख्रिस मॉरिस, राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी, मुस्तफिजुर रेहमान आणि चेतन सकारिया
सनराइजर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन
अब्दुल समद, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, केन विलियम्सन, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, केदार जाधव, भुनेश्वर कुमार, खलील अहमद आणि संदीप शर्मा