आयपीएल २०२१ च्या ४८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज संघ भिडले. या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सहा धावांनी विजय मिळवला. आरसीबीचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने हातातून निसटत चाललेला सामना पुन्हा मिळवून दिला. चहलने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये २९ धावा दिल्या आणि तीन महत्वाचे विकेट्स घेतले. यादरम्यान चहल यूएईमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. सामन्यात मिळालेल्या विजयासोबतच आरसीबीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे.
युएईत चहलची चलती
युजवेंद्र चहलच्या यूएईमधील प्रदर्शनाचा विचार केला तर त्याने आतापर्यंत ३८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्यच्या जसप्रीत बुमराहनेही ३८ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याच गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. आगामी टी२० विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये होणार आहे. असे असले तरी, चहलला विश्वचषकामध्ये संधी दिली गेली नाही. पण त्याच्या यूएईमधील प्रदर्शनानंतर निवडकर्ते आणि बीसीसीआयवर दबाव निर्माण झाला आहे.
युजवेंद्र चहलने दुबईमध्ये सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने येथे ४३ षटकांमध्ये ६.४९ च्या इकोनॉमीने २७९ धावा दिल्या आहे. त्याच्या सर्वोत्तम प्रदर्शनाचा विचार केला तर त्याने ११ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी १६ आणि स्ट्राइक रेट १४ आहे. चहलने शारजाह आणि अबुधाबीमध्ये प्रत्येकी १० – १० विकेट्स मिळवल्या आहेत. शारजाहमध्ये त्याची इकोनॉमी ६.१४ आहे. तसेच अबुधाबीमधील इकोनॉमी ६.७८ आहे. आकड्यांवरून समजते की, शारजाहामध्ये त्याच्या गोलंदाजीवर धावा करणे सोपे नाही.
बुमराहही ठरतो वरचढ
जसप्रीत बुमराहच्या युएईतील प्रदर्शनाचा विचार केला तर त्याने अबुधाबीमध्ये सर्वाधिक १८ विकेट्स मिळवल्या आहेत. त्याने ४० षटकांमध्ये ७ च्या इकोनॉमीने २८० धावा दिल्या आहेत. त्याची सरासरी १६ आसून स्ट्राइक रेट १३ आहे. बुमराहच्या सर्वोत्तम प्रदर्शनात २० धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. दुबईमध्ये त्याने १५ आणि शारजाहमध्ये ५ विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईचा फिरली गोलंदाज राहुल चहरचा विचार केला तर त्याची या तिन्ही मैदानावर ८ पेक्षा जास्त इकोनॉमी राहिली आहे. त्याने यूएईत आतापर्यंत १७ विकेट्स घेतल्या आहेत. राहुलचे प्रदर्शन युजवेंद्र चहलच्या प्रदर्शनापेक्ष खूप खराब दिसते. असे असले तरी, त्याला विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील केले गेले आहे.