आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत आपल्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरने आधीच लिलावात जाणार असल्याचे सांगितले होते. अय्यरला दिल्ली कॅपिटल्सने लिलावासाठी मुक्त केले. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सच्या नजरा अय्यरकडे लागल्याचे वृत्त आहे.
मुंबई इंडियन्सला आपल्या संघात श्रेयस अय्यरचा समावेश करण्याचे मुख्य कारण म्हणजे अय्यर हा मूळ मुंबई शहरातील रहिवासी आहे. त्याचबरोबर कानपूर कसोटीत अय्यरच्या शतकानंतर इतर संघांच्याही नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. अशा परिस्थितीत मेगा लिलावात अय्यरवर पैशांचा वर्षाव होऊ शकतो.
एका वृत्तानुसार, श्रेयस अय्यरशी लखनौ आणि अहमदाबादच्या संघानेही संपर्क साधला आहे. मुंबई इंडियन्सलाही अय्यर त्यांच्या संघात हवा आहे. अय्यर एक चांगला कर्णधार असल्याने त्याला आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ लागू शकते.
केएल राहुल नव्या संघात होऊ शकतो सामील
केएल राहुल पंजाब किंग्जसोबतचा आपला प्रवास संपवत आहे. तो लखनौ संघात सामील होऊ शकतो, असे वृत्त आहे. राहुल लखनौ संघाचे नेतृत्व करणार असल्याचे मानले जात आहे. राहुलशिवाय शिखर धवनवरही लखनौ आणि अहमदाबादच्या संघाची नजर आहे.
केकेआर सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांना रिटेन करू शकते
त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने सुनील नरीन आणि वरुण चक्रवर्ती यांना रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यंकटेश अय्यर सध्या विचाराधीन असला तरी, शुबमन गिल आणि आंद्रे रसेलसारखे खेळाडूही केकेआर संघात आहे.
आयपीएल २०२२ मध्ये खेळाडूंना रिटेन करण्याचे काय नियम आहेत?
प्रत्येक संघ खेळाडूंच्या खरेदीवर जास्तीत जास्त ९० कोटी खर्च करू शकेल.
चार खेळाडूंना कायम ठेवल्यास संघाच्या पर्समधून ४२ कोटी रुपये कापले जातील.
तीन खेळाडूंना कायम ठेवल्यास ही रक्कम ३३ कोटी होईल.
दोन खेळाडू कायम ठेवल्याने २४ कोटी कमी होतील. दुसरीकडे, एखाद्या खेळाडूला रिटेन केल्याने १४ कोटी रुपये कमी होतील.
संघ तीन पेक्षा जास्त भारतीय खेळाडूंना कायम ठेवू शकणार नाहीत. यामध्ये कॅप्ड आणि अनकॅप्ड अशा दोन्ही खेळाडूंचा समावेश असेल. दोन नवीन संघ लिलावाआधी फक्त ३ खेळाडू निवडू शकतील. यामध्ये दोन भारतीय आणि एक परदेशी खेळाडू असेल.