चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने गुरुवारी (२१ एप्रिल) मुंबई इंडियन्सची वरची फली पूर्णपणे उध्वस्त केली. एमएस धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारल्यामुळे सीएसकेला विजय मिळाला असला, तरी प्रथम गोलंदाजी करताना मुकेशने दिलेले योगदान बहुमूल्य ठरले. सामना संपल्यानंतर त्याने खास प्रतिक्रिया दिली.
सीएसकेसाठी महत्वाचे प्रदर्शन करणाऱ्या मुकेशच्या म्हणण्यानुसार क्रिकेटपटू बनने, हे त्याचे स्वप्न नव्हते. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सीएसकेला विजय मिळवून दिल्यानंतर मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) म्हणाला की, “माझा प्रवास वेगळा राहिला आहे. मी कधीच विचार नव्हता केला की, भविष्यात क्रिकेट खेळेल. मी पुण्याच्या बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. त्याठिकाणी रोज खेळाचा तास असायचा, ज्यामध्ये मी प्रत्येक खेळात भाग घ्यायचो. पण ११वी आणि १२वी मध्ये येता-येता शिक्षणातून माझे मन वळू लागले होते. त्यानंतर मी क्रिकेटला महत्व द्यायला सुरुवात केली आणि याच पद्धतीने माझी क्रिकेटपटू बनण्याची सुरुवात झाली.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“मी फक्त एक पॉवरप्लेमधील गोलंदाज नाहीये. मला माहिती आहे की, त्या वेळेत चेंडू स्विंग करणे गरजेचे असते. प्रशिक्षकांच्या देखरेखीत मी माझ्या रिस्ट पोझिशनवर रोज काय करत आहे. एक महिन्यापासून मी हे करत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यापासून मी यावर काम करत आहे, आता त्याचा परिणाम दिसत आहे. माझ्यावर कसलाही दबाव नाहीये. सर्व सीनियर खेळाडू नेहमी मदतीसाठी तयार असतात आणि मला मोकळेपणाने खेळायला सांगतात,” असे मुकेश पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, मागच्या हंगामात सीएसकेच्या नेट गोलंदाजाची भूमिका पार पाडणाऱ्या मुकेशला यावर्षी सीएसकेने मेगा लिलावात २० लाखांच्या मूळ किंमतीमध्ये खरेदी केले. दीपक चाहरसारखा महत्वाच्या गोलंदाज दुखापतीमुळे उपलब्ध नसताना सीएसकेने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. मुंबईविरुद्धच्या सामन्यात मुकेशने डावाचे पहिले षटक टाकले. पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि इशान किशन या दोन्ही सलामीवीरांना त्याने शून्यावर बाद केले. त्यानंतर डावाच्या तिसऱ्या षटकात त्याने डेवाल्ड ब्रेविसची विकेट घेतली. त्याने घेतलेल्या तीन महत्वाच्या विकेट्ससाठी त्याला सामनावीर देखील निवडले गेले.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ विकेट्सच्या नुकसानावर १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेने डावाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. यादरम्यान सीएसकेच्या ७ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या आणि संघाने हंगामातील दुसरा विजय मिळवला. दुसरीकडे मुंबई इंडियन्साला मात्र चालू हंगामातील सलग सातवा पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्स आता आयपीएलच्या इतिसाहातील पहिला संघ बनला आहे, ज्याने हंगामातील सुरुवातीचे सलग ७ सामने गमावले आहेत.