दिल्ली कॅपीटल्स( delhi capitals) संघ अजून सुद्धा आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहे. आयपीएल मेगा लिलाव (IPL 2022 mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला बॅंगलोर येथे पार पडणार आहे. दिल्लीने ४ प्रमुख खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे आणि संघ आपली प्लेइंग इलेव्हन तयार करण्याच्या उद्देशाने आयपीएल लिलावात उतरणार आहे. दिल्ली कॅपीटल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे (Praveen Amre) म्हणाले की आता संघ अशा ७ खेळाडूंना लक्ष्य करेल जे संघाला चांगले संतुलन देऊ शकतात.
दिल्ली कॅपीटल्स संघाने ४ खेळाडूंना वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणून संघात कायम ठेवले आहे. संघात रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये सलामीवीर पृथ्वी शॉ, यष्टिरक्षक फलंदाज व कर्णधार रिषभ पंत आणि फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ऍनरिच नॉर्टजे यांना संघात कायम ठेवले आहे. अमरे यांनी यावेळी आयपीएल लिलावात जोरदार स्पर्धा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
अमरे यांनी म्हटले आहे की, “प्रशिक्षक म्हणून आम्हाला संतुलित संघ हवा आहे. तसेच आम्हाला कोअर ग्रुप हवा आहे. आम्ही आमचे ४ प्रमुख वेगवेगळ्या प्रकारातील खेळाडू संघात कायम ठेवले आहेत. आमच्याकडे सलामीवीर फलंदाज, यष्टिरक्षक फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. आम्ही आमच्या मूलभूत गोष्टी बरोबर ठेवल्या आहेत.”
अमरे पुढे म्हणाले, “आता आम्हाला असे ७ खेळाडू हवे आहेत जे संघाला संतुलन देऊ शकतील. हे आमचे महत्त्वाचे आणि आव्हानात्मक लक्ष्य आहे. यावर्षी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे.”
अमरे म्हणाले, “मेगा लिलाव नेहमीच आव्हानात्मक असतात, विशेषतः जेव्हा दोन नवीन संघ असतात. ही स्पर्धा खूप खडतर असणार आहे. काही संघांकडे जास्त पैसे आहेत. तेथेच लिलावाचा अनुभव आणि कौशल्य कामी येते. दिल्ली संघाकडे सर्वात कमी ४७.५ कोटी रुपये आहेत”.
आयपीएल लिलावासाठी ५९० भारतीय आणि विदेशी खेळाडूंनी नाव नोंद केले आहे. लिलावाची तयारी सुरु झाली आहे. सर्व संघांनी आपले खेळाडू निश्चित केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे मालिका खिशात घातल्यानंतर टीम इंडिया करणार प्रयोग, धवनच्या पुनरागमनाचीही शक्यता
जमशेदपूर एफसीचा दणदणीत विजय, केरला ब्लास्टर्सला नमवून दुसऱ्या क्रमांकावर झेप!
धावांनंतर बाउंड्रीच्या विक्रमांतही विराट भल्याभल्यांवर सरस, सेहवागसह गेललाही सोडलंय पिछाडीवर