रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२२चा ३६वा सामना झाला. हैदराबादने ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरचा संघ १६.१ षटकांमध्ये ६८ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात हैदराबादने ८ षटकांमध्येच १ विकेटच्या नुकसानावर ७२ धावा करत सामना खिशात घातला. हा बेंगलोरचा हंगामातील तिसरा पराभव होता. या लाजिरवाण्या पराभवानंतर बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही सुरुवातीच्या काही षटकांमध्ये ४-५ विकेट्स गमावल्यामुळे सामना गमावला आहे. सुरुवातीला खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळत होती. परंतु आपल्याला त्याचा सामना करायला आला पाहिजे, असे डू प्लेसिस (Faf Du Plessis) म्हणाला.
डू प्लेसिस (Faf Du Plessis On RCB Batting) म्हणाला की, “सामना जसजसा पुढे गेला, तसतशी खेळपट्टीकडून फलंदाजांना मदत मिळत गेली. जर आम्ही सुरुवातीला विकेट्स गमावल्या नसत्या, तर आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो. आम्हाला वाटले होते की, खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असेल. परंतु कोणत्याही खेळपट्टीवर तुम्हाला सुरुवातीला सतर्कता बाळगावीच लागते.”
याखेरीज डू प्लेसिसने हैदराबादकडून दमदार गोलंदाजी करणाऱ्या मार्को जेन्सनचेही (Marco Jansen) कौतुक केले. ज्याने सामन्यातील दुसऱ्याच षटकात डू प्लेसिस, अनुज रावत आणि विराट कोहलीची विकेट घेतली होती. जेन्सनची स्तुती करताना डू प्लेसिस म्हणाला की, “जेन्सनने त्याच्या पहिल्याच षटकात घातक गोलंदाजी केली. त्याने दोन्ही बाजूंनी चेंडूला स्विंग केले आणि काही विकेट्स घेतल्या.”
मार्को जेन्सननेही दिली प्रतिक्रिया
जेन्सनला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले की, कोहली आणि डू प्लेसिसची विकेट घेण्यापेक्षा जास्त मला रावतला बाद केल्याचा जास्त आनंद झाला. मी सामन्यात गोष्टी आमच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न केला होता. हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील माझे सर्वश्रेष्ट षटक होते.
केन विलियम्सनने गोलंदाजांचे केले कौतुक
तसेच हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याने संघाच्या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे. तो म्हणाला की, कालचा दिवस आमच्यासाठी सर्वोत्कृष्ट दिवसांपैकी एक होता. चेंडू हवेत स्विंग होत होता आणि आमच्या वेगवान गोलंदाजांनी या संधीचा चांगलाच फायदा घेतला. आमच्या संघात ४ वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज असल्याचा आम्हाला फायदा होत आहे. पूर्ण संघाकडून कमालीचे प्रदर्शन झाले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-