इंडियन प्रीमियर लीग २०२२ची (आयपीएल) रणधुमाळी संपायला आली आहे. कोणालाही अपेक्षित नसलेल्या नवख्या गुजरात टायटन्स संघाने संपूर्ण साखळी फेरी सामन्यात दमदार प्रदर्शन करत अंतिम सामन्यात मजल मारली. तर राजस्थान रॉयल्स संघ दिवंगत माजी कर्णधार शेन वॉर्नच्या स्मरणार्थ घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या नजीक आहे. उभय संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २९ मे रोजी आयपीएल २०२२चा अंतिम सामना (IPL 2022 Final) खेळण्यासाठी भिडणार आहेत. तत्पूर्वी या दोन्ही संघांच्या अंतिम सामन्यापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूया.

गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans Journey) प्रवास
मेगा लिलावापूर्वी हार्दिक पंड्या (Hardik Pandya), शुबमन गिल आणि राशिद खान यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना गुजरातने रिटेन केले. त्यानंतर मेगा लिलावात काही मोठ्या नावांवर तर काही युवा खेळाडूंवर बोली लावत एक तगडा संघ तयार केला. परंतु आयपीएल सुरू होण्यापूर्वीच गुजरात संघाला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या अनुभवी इंग्लंडच्या सलामीवीर जेसन रॉय याने बायो बबलचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतली. मात्र या धक्क्यातून सावरत गुजरातने विजयासह हंगामाचा शुभारंभ केला.

पहिल्या सामन्यात नवख्या लखनऊ सुपरजायंट्सचे आव्हान गुजरातपुढे होते. मात्र गुजरातने अनुभवी संघासारखा खेळ दाखवत लखनऊला १५८ धावांवर रोखले. त्यानंतर १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. विजयाचा नारळ फोडल्यानंतर गुजरातने पुढे सलग २ सामने जिंकत सामना विजयांची हॅट्रिक केली. त्यानंतर चौथ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ८ विकेट्सने त्यांना हंगामातील पहिला पराभव दाखवला.

मात्र या पराभवातून पुनरागमन करत गुजरातने सलग ५ सामने जिंकले. पुढे २ पराभव, २ विजय, मग पुन्हा अजून एक पराभव नोंदवत गुजरातने प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मान मिळवला. साखळी फेरीअंती १० पैकी १० सामने जिंकत सर्वाधिक २० गुणांसह त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला.

प्लेऑफमध्ये पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानला ७ विकेट्सने आस्मान दाखवत हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील या संघाने थेट अंतिम सामन्याचे तिकीटही मिळवले आहे.

IPL फायनलमधील हुकमी एक्के; 'या' खेळाडूंना घेऊन बनवा ड्रीम ११, करोडपती होण्याची संधी I Final Dream 11

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals Journey) प्रवास
दुसरीकडे राजस्थान संघासाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम संमिश्र असा राहिला. कदाचित प्रथमच मेगा लिलावात हात मोकळे सोडून खेळाडूंवर पैसे खर्च करत राजस्थानने तगडा संघ तयार केला. गुजरातप्रमाणेच राजस्थाननेही विजयासह आपल्या हंगामाची सुरुवात केली. आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला त्यांनी ६१ धावांनी पराभूत केले.

पुढे काही सामने गमावत तर काही सामने जिंकत त्यांनी आपले प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के केले होते. परंतु चेन्नई सुपर किंग्जविरुद्धची साखळी फेरीतील शेवटची लढत जिंकत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होण्याची संधी त्यांच्या हाती होती. या संधीला दोन्ही हातांनी घट्ट पकडत राजस्थानने चेन्नईला ५ विकेट्सने पाणी पाजले आणि १४ पैकी ९ सामना विजयांसह १८ गुण खात्यात नोंदवत राजस्थानने पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला.

पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानपुढे गुजरातचेच आव्हान होते. मात्र त्यांना हे आव्हान पेलता आले नाही. गुजरातने या महत्त्वपूर्ण सामन्यात राजस्थानला ७ विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे राजस्थानला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी अजून एक पायरी चढावी लागली. त्यांनी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ७ विकेट्सने पराभूत करत अखेर अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे.

अशात आता गुजरात आणि राजस्थानपैकी कोणता संघ अंतिम सामना जिंकत विजेतेपद पटकावेल, हे पाहाणे रोमांचक असेल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२२च्या थरारक अंतिम सामन्यात ‘हा’ अभिनेता करणार कॉमेंट्री, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला

राजस्थानच्या ‘या’ जोडीवर मात करू शकले नाही, तर गुजरातसाठी ट्रॉफी जिंकणे कठीण

‘दडपणाखाली होतो, पण त्याच्या प्रेरणादायी शब्दांनी मदत केली’, बटलरने ‘या’ दिग्गजाला दिले यशाचे श्रेय