इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी (२९ मे) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. उभय संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. कारण गुजरात टायटन्ससाठी हा त्यांचा पदार्पणचा हंगाम आहे आणि त्यांना या लीगची सुरुवात विजयाने करायची आहे, तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला विजेतेपद जिंकून दिवंगत शेन वॉर्नला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची आहे.
शेन वॉर्न (Shane Warne) याच्या नेतृत्वात आयपीएलच्या पहिल्या हंगमात म्हणजेच २००८ साली राजस्थान रॉयल्सने या लीगचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर राजस्थानचा संघ एकदाही या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही. यावर्षी राजस्थानने अंतिम सामना गाठला आहे, पण त्यांचा दिग्गज शेन वॉर्न संघाची ही कामगिरी पाहण्यासाठी त्यांच्यासोबत नाहीये. मार्च महिन्यात वॉर्नचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अशात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यावर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकून वॉर्नला श्रद्धांजली वाहू इच्छितो.
वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थानने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली असली, तरी तो हंगाम सुरू होण्यापूर्वी असे काही घडणार होते, ज्यामुळे राजस्थानने ट्रॉफीही जिंकली नसती आणि वॉर्नच्या नावावर हा विक्रमही झाला नसता. शेन वॉर्नने त्याची ऑटो बायोग्राफी ‘नो स्पिन’मध्ये हा प्रसंग उलघडून सांगितला आहे.
त्याचे झाले असे की, वॉर्न आयपीएलचा पहिला हंगाम सुरू होण्यापूर्वीच राजस्थान संघ सोडण्याच्या तयारीत होता, पण नंतर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे मालक मनोज बदाले (Manoj Badale) यांनी त्याच्याशी जुळवून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो संघात कायम राहिला.
वॉर्नने सपोर्ट स्टाफसोबत मिळून ५० खेळाडूंमधून संघात सहभागी करण्यासाठी १६ खेळाडू निवडले होते, पण संघमालक मनोज बदाले यांना अजून एका खेळाडूला यामध्ये सहभागी करायचे होते. त्यावेळी अनकॅप्ड खेळाडू रविंद्र जडेजा आणि स्वप्निल असनोडकर यांनी वॉर्नला प्रभावित केल्यामुळे त्यांची संघात निवड झालेली, पण आसिफ नावाच्या खेळाडूने त्याला प्रभावित केले नसल्यामुळे वॉर्नने त्याला निवडले नव्हते. परंतु बदाले मात्र या खेळाडूला संघात घेण्यासाठी आग्रही होते.
माध्यमांतील वृत्तानुसार बदाले आसिफला संघात सहभागी करण्यासाठी वॉर्नवर दबाव टाकत होते, पण वॉर्नने त्यांना सांगितेल होते की, जर त्याला निवडले, तर ड्रेसिंग रूममध्ये माझी इज्जत धूळीत मिळेल. या प्रसंगी वॉर्नने टोकाचा निर्णय घेत त्यांना स्पष्टपणे सांगितले की, “जर त्यांना आसिफ संघात हवा आहे, तर मी माझे पैसे परत करतो आणि संघातून बाहेर होतो.” बदाले यावर त्याला म्हणाले की, तू याविषयी सीरियस आहे का? तर वॉर्न म्हणाला की, “हो खूप जास्त, मला माझ्या निर्णयावर ठाम राहू द्या.”
वॉर्न त्याच्या भूमिकेवर इतका ठाम होता की, बदालेंनी आसिफला डगआउटमध्ये सहभागी करण्याची विनंती केली, पण तरीही त्याने मानले नाही. अखेर संघमालकांना माघार घ्यावी लागली. नंतर वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थानने विजेतेपद पटकावले आणि संघमालकांसोबत त्याने संबंध मजबूत बनले. राजस्थान रॉयल्स यावर्षी विजेतपद जिंकून वॉर्नला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करू इच्छित असल्याचे, त्यांचा कर्णधार संजू सॅमसनने बोलून दाखवले आहे. आता हे प्रत्यक्षात खरे होते की नाही, हे सामना संपल्यानंतर कळेल.