सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२२मधील पहिले दोन सामने गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले होते. त्यांनी सलग पुढील पाच सामन्यावर आपला हक्क सांगितला होता. यानंतर असे वाटले होते की, हैदराबाद प्लेऑफमध्ये सहजरीत्या प्रवेश करेल. मात्र, तसे काहीच झाले नाही. या ५ विजयी सामन्यांनंतर पुढील सलग ५ सामने त्यांनी गमावले आहेत. शनिवारी (दि. १४ मे) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धही त्यांना ५४ धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. संघाप्रमाणेच संघाचा कर्णधार केन विलियम्सनही खराब फॉर्ममधून जात आहे. त्याला या हंगामात खास कामगिरी करता आली नाहीये. त्यामुळे त्याच्या खराब फॉर्मवर भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने निशाणा साधत हैदराबाद संघाला सल्ला दिला आहे.
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला की, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचे आता जेवढेही सामने राहिले आहेत, त्यामध्ये आता केन विलियम्सन (Kane Williamson) याला बाहेर काढले पाहिजे. त्याच्या जाग्यावर दुसऱ्या खेळाडूला संधी दिली पाहिजे.
या हंगामात केन विलियम्सनची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. तो जवळपास प्रत्येक सामन्यात फ्लॉप ठरत आहे. त्यामुळेच हैदराबाद संघाला म्हणावी तशी कामगिरी करता येत नाहीये. कोलकाताविरुद्धच्या सामन्यातही विलियम्सन फक्त ९ धावांवर तंबूत परतला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘केन विलियम्सनला बाहेर काढण्याची हीच योग्य वेळ’
वीरेंद्र सेहवागच्या मते, जेव्हा संघाचा कर्णधारच चांगली कामगिरी करणार नाही, तर इतर संघ संघर्ष कसा करणार? माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “जर नेतृत्व करणाराच चांगली कामगिरी करत नसेल, तर संघ कसा लढणार. केन विलियम्सनला धावा करायच्या आहेत आणि त्याही चांगल्या स्ट्राईक रेटने. त्याचा जोडीदार अभिषेक शर्मा पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळत नाही. केन विलियम्सनने ब्रेक घेऊन दुसऱ्या कोणाला तरी कर्णधारपद द्यावे. त्यांना वगळण्याची हीच योग्य वेळ आहे.”
सनरायझर्स हैदराबाद संघाला कोलकाताविरुद्ध या हंगामातील सातव्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना प्लेऑफमध्ये एंट्री करण्याच्या अपेक्षांनाही तडा गेला आहे. दुसरीकडे, कोलकाताने स्वत:ला प्लेऑफच्या यादीत कायम ठेवले आहे.