येत्या २६ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामाची सुरुवात होणार आहे. हा हंगाम २९ मे रोजी संपेल. त्यापूर्वी बीसीसीआयने काही नवीन नियम जारी केले आहेत. यामध्ये संघाची प्लेइंग इलेव्हन आणि डीआरएस यासंदर्भातील नियमांचा समावेश आहे. बीसीसीआयने सोमवारी (१४ मार्च) हे नियम जारी केले आहेत. याच नियमांबद्दल सविस्तर आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत…
१. डीआरएसच्या संख्येत वाढ
निर्णय पुनरावलोकन प्रणाली अर्थात डीआरएसच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आयपीएल (IPL 2022) मध्ये सर्वप्रथम २०१८ साली डीआरएसचा वापर केला गेला. तेव्हापासून ते २०२१ आयपीएल हंगामापर्यंत प्रत्येक संघ एक-एक डीआरएस घेऊ शकत होता. परंतु आता बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, प्रत्येक संघाकडे एक अतिरिक्त डीआरएस असेल. अर्थात प्रत्येक संघाकडे २ डीआरएस उपलब्ध असतील.
२. नवा फलंदाज येणार स्ट्रायकर एन्डला
मेरिलबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीने (MCC) काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या नियमानुसार, जेव्हा एखादा फलंदाज झेलबाद होईल, तेव्हा नवा खेळाडू स्ट्राईक घेईल आणि पुढच्या चेंडूचा सामना करेल (जोपर्यंत एक षटकाचा शेवट होत नाही). हा बदल यापूर्वी पहिल्यांदा इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून द हंड्रेड लीग स्पर्धेत अजमावून पाहण्यात आला होता. आता हा बदल आयपीएलमध्येही पाहायला मिळेल.
३. कोविड-१९ मुळे सामना नंतर खेळवला जाणार
नवीन नियमानुसार (IPL 2022 New Rules) जर संघात एखाद्याला कोरोनाची बाधा झाली, तर संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. जर प्लेइंग इलेव्हन तयार होऊ शकली नाही, तर सामना पुन्हा आयोजित केला जाईल. जर सामना नंतरही खेळवला जाऊ शकला नाही, तर मात्र याचा निर्णय तांत्रिक समितीकडे सोपवला जाईल.
बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, “बोर्ड त्यांच्या पद्धतीने सामना पुन्हा आयोजित करण्याचा प्रयत्न करेल. जर असे होऊ शकले नाही, तर हा मुद्दा आयपीएलच्या तांत्रिक समितीकडे पाठवला जाईल. तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम असेल, जो सर्वांना मान्य करावा लागेल. हे जुन्या नियमांप्रमाणेच आहे, यामध्ये फक्त एक बदल केला जाईल. जुन्या नियमांमध्ये म्हटले गेले होते, बोर्ड नंतर सामना आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर हे शक्य नसेल तर त्यामुळे प्रभावित झालेल्या संघाला पराभूत समजले जाईल आणि त्याच्या विरोधी संघाला दोन गुण दिले जातील.”
४. सुपर ओव्हरमध्येही निकाल न लागल्यास अंतिम सामन्याचा निकाल गुणतालिकेतील क्रमवारीनुसार लागणार
आयपीएलमध्ये कोणताही सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवून सामन्याचा निकाल लावला जातो. सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली तर पुन्हा सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाते. अशात नव्या नियमानुसार आयपीएलचा अंतिम सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली, तर गुणतालिकेतील संघाच्या क्रमवारीनुसार विजेता संघ घोषित केला जाईल. अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी संघांपैकी जो संघ साखळी फेरीच्या अंती गुणतालिकेत अधिक गुणांसह वरच्या क्रमांकावर असेल, त्यांना विजेतेपद दिले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताने राखले श्रीलंकेवर वर्चस्व! दिवस-रात्र कसोटीतील विजयाचे ‘हे’ ५ शिल्पकार
कोण आहे तो अनोळखी खेळाडू, ज्याच्याकडे कसोटी मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहितने सोपवली ट्रॉफी?