भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी२० सामना आज ( शुक्रवार, २३ जानेवारी) रायपूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्याची सुरूवात भारतीय प्रमाणवेळेनुसार सांयकाळी ७ वाजता होणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिला सामना भारताने ४८ धावांनी जिंकला. टी२० विश्वचषकाची तयारी करण्यासाठी भारताकडे या मालिकेच्या रुपात शेवटची संधी आहे. त्याआधीच भारताचा स्टार फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरला आहेत. त्याचा हा फॉर्म दुसऱ्या सामन्यातही कायम राहिला तर तो थेट बाकावर जाईल.
तिलक वर्माच्या अनुपस्थितीत इशान किशन याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघात घेतले. त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली आहे, मात्र याचा त्याने योग्य तो फायदा घेतला नाही. तो पहिल्या सामन्यात ५ चेंडूत ८ धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने दोन चौकार मारले होते. दुसऱ्या टी२०तही त्याची ही निराशाजनक कामगिरी राहिली तर तिसऱ्या टी२०साठी आणि विश्वचषकातील त्याची जागा धोक्यात येणार आहे.
संजू सॅमसनही पहिल्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला. तो ७ चेंडूत १० धावा करत बाद झाला. किशनप्रमाणे त्यालाही या मालिकेत उत्तम कामगिरी करावी लागणार आहे. तसे झाले नाही तर भारताच्या सलामीवीर जोडीमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विशेष म्हणजे हे दोघेही भारताच्या टी२० विश्वचषकाचे प्रमुख विकेटकीपर-फलंदाज आहेत.
भारतासाठी धीर देणारे वृत्त म्हणजे संघाचा स्फोटक फलंदाज तिलक वर्मा दुखापतीतून सावरत आहे. तो भारताचा मधल्या फळीतील महत्वाचा फलंदाज आहे. त्याच्या उल्लेखनीय खेळीने भारताने आशिया कप जिंकला होता.
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, इशान किशन (विकेटकीपर) शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.





