इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या १६व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आमने- सामने होते. या सामन्यात गुजरातने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. अष्टपैलू राहुल तेवतिया गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला, ज्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवला. गुजरातसाठी हा त्यांचा पहिला आयपीएल हंगाम आहे आणि यामध्ये त्यांनी सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकत खास विक्रम नोंदवला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (५ आयपीएल ट्रॉफी विजेता) आणि चेन्नई सुपर किंग्ज (४ आयपीएल ट्रॉफी विजेता) यांच्यासाठी आयपीएल २०२२ची सुरुवात खूपच निराशाजनक राहिली आहे. या दोन्ही संघांनी त्यांचे पहिले तिन्ही सामने गमावले आहेत, तर दुसरीकडे नवख्या गुजरात टायटन्सने मात्र हंगामातील त्यांचे पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवल्यानंतर गुजरात गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याचसोबत संघाने एका खास यादीत स्वतःचे नाव नोंदवले आहे.
आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी फक्त दोन संघ असे होते, ज्यांनी हंगामातील सुरुवातीचे त्यांचे तिन्ही सामने जिंकले होते. आता या यादीत गुजरात टायटन्सच्या रूपात तिसरा संघ सहभागी झाला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लायन्स आणि गुजरात टायटन्स हे तीन संघ असे आहेत, ज्यांनी एखाद्या आयपीएल हंगामातील त्यांचे पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. विशेष गोष्ट ही आहे की, गुजरातचे प्रतिनिधित्व करणारे दोन्ही संघ यामध्ये सहभागी आहेत.
दरम्यान, गुजरात आणि पंजाब यांच्यात शुक्रवारी (८ एप्रिल) झालेल्या या सामन्याचा विचार केला, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने ९ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातने अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि यादरम्यान संघाने ४ विकेट्सही गमावल्या.
शेवटच्या २ चेंडूत गुजरातला विजयासाठी १२ धावांची आवश्यकता होती आणि अष्टपैलू राहुल तेवतिया खेळापट्टीवर होता. तेवतियाने ओडियन स्मिथच्या षटकातील शेवटचे दोन्ही चेंडू मैदानाबाहेर मारले आणि संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तेवतियाची नाद खुळा कामगिरी, २ गगनचुंबी षटकार ठोकत बनला ‘जड्डू’ अन् धोनीनंतरचा तिसराच खेळाडू
‘पंत जबाबदारीने खेळला, तर या आयपीएलमध्ये अपयशी ठरेल’, भारतीय दिग्गजाचा सल्ला