जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, २९ मे रोजी आयपीएल २०२२चा अंतिम सामना खेळला गेला. पहिल्यांदाच आयपीएलच्या रणभूमीत उतरलेल्या गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करून, आयपीएलची मानाची ट्रॉफी आपल्या नावे केली. तब्बल ५ हजार कोटींपेक्षा जास्त किमतीची बोली लावत लंडनस्थित सीव्हीसी कॅपिटल्सने ही फ्रॅंचाईजी विकत घेतली होती. त्या किमतीचे चीज करत आज गुजरात आयपीएल चॅम्पियन बनले आहे. त्यांच्या या अविस्मरणीय प्रवासात खेळाडू आणि मॅनेजमेंटने अत्यंत नियोजनबद्ध कामगिरी केली. गुजरातला हे विजेतेपद मिळवून देण्यात अनेक खेळाडूंचा मोलाचा वाटा राहिला. मात्र, संघातील पाच असे खेळाडू होते, ज्यांनी खऱ्या अर्थाने संघाची नौका पार केली. या लेखात आपण त्याचा पाच खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
गुजरात टायटन्सने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशात सर्वात मोठा वाटा राहिला तो म्हणजे कर्णधार हार्दिक पंड्याचा. मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर, त्याने गुजरात टायटनच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. दुखापतीतून सावरत असताना आणि प्रथमच कोणत्याही संघाचे नेतृत्व करताना त्याने लाजवाब कामगिरी केली. संघात तितके अनुभवी फलंदाज नसल्याने तो स्वतः तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळायला उतरला. आजवरच्या आपल्या आयपीएल करिअरमधील सर्वोत्तम फॉर्ममध्ये तो दिसला. फलंदाजी सोबतच त्याने दोन वर्षानंतर गोलंदाजी करताना मोक्याच्या वेळी संघाला विकेट मिळवून दिल्या. ही त्याच्या नेतृत्वाचीच कमाल होती की, एक सामान्य भासणारा संघ आयपीएलची ट्रॉफी उंचावू शकला.
भारतीय संघात खेळणारा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्याकडे गुजरात टायटन्सच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी होती. त्याने आपली ही जबाबदारी पूर्णपणे निभावली. पावर प्ले आणि डेथ अशा दोन्ही फेजमध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर केला. कित्येकदा संघाला पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवून देण्याचे काम शमीने केले. सोबतीला लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ आणि यश दयाल यांच्यासारखे वैविध्यपूर्ण गोलंदाज असताना, शमीने आपल्या अनुभवाच्या जोरावर या सर्वांना पूरक अशीच कामगिरी करून दाखवली.
गुजरात टायटन्सला आपल्या इतिहासातील पहिला मॅच विनर कोण मिळाला तर तो म्हणजे राहुल तेवतिया. लिलावात भलीमोठी १० कोटींची बोली लागल्यानंतर अनेकांनी, ही त्याच्यासाठी अधिक किंमत असल्याचे बोलले होते. मात्र, पंजाब किंग्सविरूद्ध दुसऱ्याच मॅचमध्ये दोन चेंडूवर १२ धावांची गरज असताना, त्याने दोन षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धही त्याने मोठ्या आणि मॅचविनिंग खेळ्या करत ‘फिनीशर’ हे आपले नवे बिरुद सार्थ केले.
आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्ससाठी सर्वात फायदे का सौदा ठरला तो म्हणजे अफगाणिस्तानचा राशिद खान. ऑक्शन आधीच त्याला मॅनेजमेंटने संघात ड्राफ्ट केले होते. जगभरातील सर्व टी२० लीग खेळण्याचा अनुभव असलेल्या राशिदने, या वर्षी देखील आपली तीच झलक दाखवली. किफायतशीर गोलंदाजी करत त्याने नेहमी विरोधी संघांवर दबाव बनवला. तसेच चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याच्या मॅचविनिंग खेळ्या आल्या. या सर्वांमध्ये प्लस म्हणजे तो संघाचा उपकर्णधार होता. हार्दिक पांड्या अनेकदा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यावर, राशिद आपली ही जबाबदारीदेखील अनुभवाने आणि पूर्ण क्षमतेने पार पाडताना दिसला.
गुजरात टायटन्स आणि संपूर्ण आयपीएल चाहत्यांसाठी सर्वाधिक सरप्राईज पॅकेज ठरला डेव्हिड मिलर. एकवेळ टी२० क्रिकेटचा सुपरस्टार असलेला मिलर, मागील तीन वर्षांपासून आपल्या लौकिकाला साजेसा खेळताना दिसला नव्हता. या वर्षीच्या मेगा लिलावामध्ये पहिल्या राऊंडला तो अनसोल्ड गेला होता. मात्र, अखेरच्या क्षणी गुजरातने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले… मिलरला वारंवार संधी दिल्यानंतर त्याने आपला नैसर्गिक खेळ दाखवला. सीएसकेविरुद्ध नाबाद ८९ आणि पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध नॉट आउट ६९ या दोन्ही डाव त्याच्या जुन्या किलर अंदाजाची साक्ष देणाऱ्या होत्या. पूर्ण लीगमध्ये आठ वेळा नाबाद राहत, त्याने राहुल तेवतिया व राशिद खान यांना जोडीला घेत गुजरातसाठी फिनिशिंग चॅप्टर लिहीला.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच ना! IPLचा शेवट होताच श्रेयस अय्यरने खरेदी केली लग्झरी कार, किंमत वाचून तोंडात घालाल बोटे
IPL 2023मध्ये ‘हे’ ३ बदल करत सीएसके करणार दमदार पुनरागमन, दुसरा बदल खूपच महत्त्वाचा
द्विपक्षीय टी२० मालिका बंद करा, म्हणजे एका वर्षात २ वेळा आयपीएल होईल; पाहा कोणी केलंय विधान






