मुंबई इंडियन्सचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने २३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याच्या जुन्या किस्स्याची आठवण काढत त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. इशानने एकदा महान फिरकीपटूंमध्ये गणना होणाऱ्या हरभजनच्या गोलंदाजीवर लांबच लांब षटकार मारले होते, त्याच किस्स्याला हरभजनने उजाळा दिला आहे. रविवारी (२७ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात इशानने मॅच विनिंग प्रदर्शन केले होते. त्याच्या याच प्रदर्शनाचे कौतुक करताना हरभजनने जुना किस्सा सांगितला आहे.
मेगा लिलावात मुंबईने सलामीवीर आणि धाकड युवा फलंदाज इशानला (Ishan Kishan) १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो मेगा लिलावात मोठ्या रक्कमेला विकला जाणारा भारताचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. आपल्या वजनदार किंमतीप्रमाणेच दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही (MI vs DC) त्याने शानदार खेळी केली आहे. रोहितसोबत सलामीला फलंदाजीला येत ४८ चेंडूंमध्ये नाबाद ८१ धावा चोपत त्याने आपली योग्यता सिद्ध केली आहे.
इशानच्या या खेळीवर प्रभावित होत हरभजनने (Harbhajan Singh) एका कार्यक्रमादरम्यान म्हटले की, “इशान एका परिपक्व खेळाडूच्या रूपाने विकसीत झाला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित बाद झाल्यानंतर त्याने मोर्चा सांभाळला. त्याने मनाशी ठाण मांडली होती की, डावाच्या शेवटपर्यंत खेळायचे आणि त्याने हा विचार खराही करून दाखवला. त्याने स्वत:ला एक फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. मी त्याचा चाहता बनलो आहे.”
“असेच एकदा आयपीएल सामन्यादरम्यान मी गोलंदाजी करत होतो, तेव्हा त्याने माझ्या गोलंदाजीवर २ की ४ षटकार मारले होते. त्याच्या फलंदाजीवरील विश्वासाला पाहून मी आश्वस्त झालो होतो की, तो पुढे जाऊन एक अद्भुत खेळाडू बनेल. आता तो जेव्हाही मैदानावर उतरतो, तेव्हा मी त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटत असतो,” असे पुढे हरभजन (Harbhajan Singh Praised Ishan Kishan) म्हणाला.
दिल्लीविरुद्ध इशानने खोऱ्याने काढल्या धावा
दरम्यान दिल्लीविरुद्ध इशानने धमाकेदार खेळी केली. सलामीला फलंदाजीला येत त्याने वैयक्तिक नाबाद ८१ धावा फटकावल्या. ४८ चेंडू खेळताना २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने त्याने ही शानदार खेळी केली होती. याखेरीज इशान आणि सलामीवीर व कर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची प्रशंसनीय भागीदारीही झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
स्वत:च लावलेली पैज हारला हैदराबादचा वेगवान गोलंदाज; सरावादरम्यान यॉर्करही आला नाही टाकता