रविवारी (२७ मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा दुसरा सामना खेळण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दमदार खेळाडू इशान किशनने नाद खुळा फलंदाजी केली. या सामन्यात त्याने सर्वाधिक धावा तर केल्याच, त्याचबरोबर त्याने ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरच्या विक्रमही मोडला. यामुळे तो आता मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे.
दिल्लीने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी सलामीला आलेल्या इशान किशनने (Ishan Kishan) ४८ चेंडूंचा सामना करताना नाबाद ९१ धावा ठोकल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ११ चौकार ठोकले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १६८.७५ इतका होता. हे इशानचे मुंबईकडून खेळताना सलग तिसरे अर्धशतक होते. यापूर्वी त्याने २०२१च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद ५० आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ८४ धावा फटकावल्या होत्या. त्याने मागील सलग ३ डावांमध्ये २१५ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सलग ३ सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी आला आहे.
यापूर्वी मुंबईकडून खेळताना सलग ३ डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने २०१ धावा केल्या होत्या. यानंतर सचिन आणि सनथ जयसूर्या संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी १९८ धावा केल्या होत्या. यानंतर मुंबईकडून खेळताना सलग ३ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर लेंडल सिमन्स आहे. त्याने १९७ धावा केल्या होत्या. या विक्रमात पाचव्या क्रमांकावर क्विंटन डी कॉक असून त्याने १८४ धावा केल्या होत्या.
मुंबई इंडियन्सकडून सलग ३ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
२१५ धावा- इशान किशन*
२०१ धावा- सचिन तेंडुलकर
१९८ धावा- सचिन तेंडुलकर
१९८ धावा- सनथ जयसूर्या
१९७ धावा- लेंडल सिमन्स
१८४ धावा- क्विंटन डी कॉक
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs DC: दिल्लीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; मुंबईकडून ५ खेळाडूंचे पदार्पण
अर्रर्र! मागील १० हंगामांपासून मुंबई इंडियन्स ‘या’ गोष्टीत ठरतोय फ्लॉप; वाचून तुम्हालाही बसेल शॉक






