बुधवारी (३० मार्च) आयपीएल २०२२ चा सहावा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने ३ विकेट्स राखून विजय मिळवला. दक्षिण अफ्रिकी दिग्गज फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीचा चालू हंगामातील हा पहिला विजय होता. डू प्लेसिस या विजयानंतर आनंदी आहे, पण अशी एक गोष्ट आहे, जी त्याच्या इच्छेप्रमाणे झाली नाही. सामना संपल्यानंतर त्याने स्वतःची प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी केली आणि आरसीबीला विजयासाठी १२९ धावांचे सोपे लक्ष्य दिले. लक्ष्य सोपे असूनही आरसीबीला विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत खेळावे लागले. शेवटच्या षटकांमध्ये यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने ७ चेंडूत १४ धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) याच्या मते विजय मिळवण्यासाठी संघाला जास्त संघर्ष करावा लागला.
आरसीबीच्या विजयात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगाचे योगदान मोलाचे राहिले. त्याने २० धावा खर्च करून तब्बल ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी हसरंगाला सामनावीर निवडले गेले.
विजयानंतर डू प्लेसिस म्हणाला की, “हा चांगला विजय होता. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना सकारात्मक विचारांसह उतरले पाहिजे. सामना एवढ्या शेवटीपर्यंत नव्हता गेला पहिजे. कोलकाताच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले.”
केकेआर आणि आरसीबीचा (KKR vs RCB) हा सामना मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळला गेला. आरसीबीने पंजाब किंग्जविरुद्धचा त्यांचा पहिला सामनाही या स्टेडियममध्ये खेळला होता, पण त्या सामन्यात त्यांनी २०० पेक्षा मोठी धावसंख्या उभी केली होती. खेळपट्टीत झालेल्या बदलाविषयी बोलताना डू प्लेसिस म्हणाला की, “या खेळपट्टीवर आज खूप सीम आणि बाऊंस होता. दोन तीन दिवसांपूर्वी याठिकाणी २०० विरुद्ध २०० असा सामना झालेला, पण आज १२० विरुद्ध १२०. आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने जिंकलो पाहिजे होतो, पण विजय हा विजय असतो.”
महत्वाच्या बातम्या –
Video: अगग! पाकिस्तानी क्रिकेटरच्या मोठ्या चूकीनंतरही ऑस्ट्रेलियाचा अर्धशतकवीर दुर्देवीरित्या धावबाद