इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे बिगूल वाजले असून येत्या २६ मार्चपासून आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू आहे. या हंगामातील पहिला सामना मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या संपूर्ण हंगामादरम्यान बरेच जुने विक्रम मोडताना आणि नवे विक्रम बनताना दिसतील. दरम्यान आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल अव्वलस्थानी आहे. मात्र आयपीएल सामन्याच्या शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात भारतीय फलंदाजाचा दबदबा आहे. तो फलंदाज अजून कोण नसून माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आहे.
आयपीएलच्या (IPL) आतापर्यंतच्या १४ हंगामांमध्ये सामन्यातील २० व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम (Most Sixes In 20th Over Of IPL Match) चेन्नई सुपर किंग्जच्या धोनीच्या (MS Dhoni) नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये २० व्या षटकात आतापर्यंत एकूण ५० षटकार मारले आहेत. मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड (Kieron Pollard) या विक्रमात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २० व्या षटकात ३० षटकार मारले आहेत.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा हा २३ षटकारांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याबरोबर अष्टपैलू हार्दिक पंड्याही संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. हार्दिकनेही २० व्या षटकात फलंदाजी करताना २३ षटकार ठोकले आहेत.
आयपीएल सामन्याच्या २०व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज-
५० षटकार- एमएस धोनी
३० षटकार- कायरन पोलार्ड
२३ षटकार – रोहित शर्मा
२३ षटकार – हार्दिक पांड्या
२२ षटकार – रवींद्र जडेजा
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्यातही धोनी टॉप-५ मध्ये
याखेरीज आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या विक्रमातही धोनी पहिल्या ५ फलंदाजांमध्ये आहे. त्याने २२० आयपीएल सामने खेळताना २१९ षटकार मारले असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापूर्वी ख्रिस गेल सर्वाधिक ३५७ षटकारांसह अव्वलस्थानी आहे. एबी डिविलियर्स २५१ षटकार आणि रोहित शर्मा २२७ षटकारांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर कायरन पोलार्ड २१४ षटकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सच्या नव्या खेळाडूंसह पाँटिंग रोज करतोय दोन वेळचं जेवण, ‘हे’ आहे कारण
अष्टपैलू म्हणजे विजयाची गॅरंटी! लखनऊ आणि चेन्नईकडे भरमार, पण ‘या’ संघांकडे मर्यादित पर्याय
‘मी अजून वाट पाहू शकत नाही’, जुन्या सहकाऱ्यासोबत पुन्हा आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहे कमिन्स