मुंबई। मंगळवारी (१२ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील २२ वा सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी, येथे पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईने २३ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, बेंगलोरच्या पराभवाचे कारण वरच्या फळीतील फलंदाजांचे अपयश हे एक होते. यामध्ये विराट कोहली याच्या विकेटचाही समावेश होता. त्याला बाद करण्यासाठी चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी याने एक वेगळी रणनीती आखल्याचेही दिसले.
विराट अडकला धोनीच्या जाळ्यात
या सामन्यात चेन्नईने बेंगलोरसमोर २१७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरने त्यांचा कर्णधार आणि सलामीवीर फाफ डू प्लेसिसची (Faf du Plessis) विकेट तिसऱ्याच षटकात गमावली होती. त्यामुळे माजी कर्णधार विराट (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. मात्र, त्याच्यासाठी यष्टीरक्षक एमएस धोनीने (MS Dhoni) क्षेत्ररक्षण लावण्याची जबाबदारी घेतली.
खरंतर रविंद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार आहे. मात्र, धोनी यष्टीरक्षक असल्याने आणि त्याचा अनुभव पाहाता, तो विराट फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण लावताना दिसला. पाचव्या षटकाला सुरुवात होण्यापूर्वी विराटची क्षमता पाहाता धोनीने त्याची बुद्धी वापरत शिवम दुबेला (Shivam Dube) फाईन लेगवरून डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाठवले.
धोनीने क्षेत्ररक्षणात हा बदल केल्यानंतर लगेचच पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर विराट बाद झाला. हे षटक मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) टाकत होता. त्याने पहिला चेंडू आखुड टप्प्याचा टाकला. ज्यावर विराटने पुल शॉट मारला. पण त्याचा चेंडू सीमापार होऊ शकला नाही आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या दुबेच्या हाती झेल गेला. त्यामुळे विराटला ३ चेंडूत १ धाव करून माघारी परतावे लागले. ही बेंगलोरची पॉवर प्लेमधील दुसरी विकेट ठरली. त्याच्या विकेटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
चेन्नईने उभारला धावांचा डोंगर
बेंगलोरने या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते (CSK vs RCB). या आमंत्रणाचा स्विकार करत चेन्नईने २० षटकांत ४ बाद २१६ धावांचा डोंगर उभा केला. चेन्नईकडून रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली. उथप्पाने ५० चेंडूत ८८ धावा केल्या. यामध्ये त्याने ९ षटकारांसह ४ चौकार मारले. तसेच शिवमने ४६ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांसह ९५ धावांची खेळी केली. बेंगलोरकडून वनिंदू हसरंगाने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर २१७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बेंगलोरकडून शाहबाद अहमदने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तसेच सुयश प्रभूदेसाईने १८ चेंडूत ३४ आणि दिनेश कार्तिकने १४ चेंडू ३४ धावांची आक्रमक खेळी करत बेंगलोरला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अन्य कोणाची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे बेंगलोरला २० षटकांत ९ बाद १९३ धावा करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022| चेन्नईने ‘या’ विक्रमात अव्वलस्थानी असलेल्या बेंगलोरला गाठलेच! मुंबई-पंजाब अद्याप खूप दूर
IPL 2022| पहिल्या विजयाची आस असलेल्या मुंबईसमोर पंजाबचे आव्हान; केव्हा-कुठे होणार सामना, घ्या जाणून