इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामाचा शेवट झाला. गुजरात टायटन्स संघाने या हंगामाचा विजयी चषक उंचावत सगळ्यांना हैराण केले आहे. रविवारी (२९ मे) नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या हंगामाच्या अंतिम सामन्यात गुजरात संघाने राजस्थान रॉयल्सला ७ विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे राजस्थानचे दुसऱ्यांदा आयपीएल जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले.
पंधराव्या आयपीएलमध्ये राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) हा भलताच फॉर्ममध्ये दिसला आहे. या आयपीएल हंगामात त्याने एकट्यानेच ८५०च्या पार धावा करत ऑरेंज कॅपवर आपला हक्क दाखवला आहे. यावेळी त्याने १७ सामन्यांत चार शतके ठोकत ५७.५३च्या सरासरीने ८६३ धावा केल्या आहेत. यामुळे त्याला मोस्ट व्हॅल्यूएबल पुरस्कार अर्थात मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. पण तरीही तो निराश दिसत होता.
अंतिम सामन्यानंतर झालेल्या सामना समारोपावेळी बटलर गुजरातचे अभिनंदन करत म्हणाला, “फक्त एक विजेतेपद सोडले असता माझ्या ज्या बाकी सगळ्या अपेक्षा होत्या त्या या हंगामातून पूर्ण झाल्या आहेत. संघाकडून चांगली कामगिरी करणे हे आवश्यक आहे. त्यासाठी संघाने खेळाडूंवर आणि खेळाडूंनी संघावर विश्वास दाखवणे, हे पण तितकेच महत्वाचे आहे. तो या संघाने माझ्यावर दाखवला. गुजरात संघाने उत्तम खेळ केला याबद्दल त्यांचे अभिनंदन.”
“आतापर्यत मी अनेक अंतिम सामन्यात पराभूत झालो आहे. आजच्या सामन्यात मला संधी मिळाली, पण आम्ही जिंकू शकलो नाही याचे मला खूप वाईट वाटत आहे. या पराभवाने खचून न जाता पुढच्या कामगिरीत सुधारणा करण्यावर माझा कल असणार आहे. संघात जे युवा खेळाडू आहे, त्यांनी या अपयशातून काहीतरी शिकावे”, असेही बटलर पुढे म्हणाला.
इंग्लंडचा विकेटकिपर बटलरने या हंगामात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आहे. तो या हंगामात सर्वाधिक असे ४५ षटकार आणि ८३ चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे.
या हंगामात १४९.०५च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या बटलरने ६१९ धावा वेगवान गोलंदाजांच्या विरुद्ध केल्या आहेत. त्याने एका हंगामात वेगवान गोलंदाजांच्या विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला (Virat Kohli) मागे सारत पहिला क्रमांक गाठला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या विराटने २०१६च्या आयपीएल हंगामात वेगवान गोलंदाजांच्या विरुद्ध ६०९ धावा केल्या होत्या.
तसेच आयपीएल इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बटलर ८६३ धावा करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ९७३ धावा करत विराट कोहली या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
राजस्थानची या हंगामातील गुजरात विरुद्धची कामगिरी निराशाजनकच ठरली आहे. ते गुजरात विरुद्ध झालेल्या साखळी सामने, पहिला क्वालिफायर आणि अंतिम फेरी या तीनही सामन्यात पराभूत झाले आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राशिद खानची मोठी भविष्यवाणी! ‘हा’ खेळाडू क्रिकेटविश्वात होईल खूप यशस्वी
कर्णधार हार्दिकचेही मास्टर धोनीच्या पावलावर पाऊल, ट्रॉफी जिंकल्यानंतर केले ‘हे’ कौतुकास्पद काम