सनरायझर्स हैदराबादचा वेगावान गोलंदाज उमरान मलिकच्या चेंडूचा वेग पाहून जाणकार हैराण आहेत. उमराच्या चेंडूला गती जरी असली, तरी आयपीएलच्या चालू हंगामात तो विरोधी संघाला धावा करण्यापासून रोखू शकलेला नाहीये. रविवारी (८ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात देखील उमरान सनरायझर्स हैदराबादसाठी महागात पडला. हैदराबादने हा सामना तब्बल ६७ धावांनी गमावला. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि सध्या समालोचकाची भूमिका पार पाडणारे रवी शास्त्री त्याच्या गोलंदाजीविषयी व्यक्त झाले आहेत.
उमरान मलिक (Umran Malik) आयपीएल २०२२मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज आहे. त्याने स्वतःचाच विक्रम मोडून दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तब्बल १५७ किमी ताशी वेगाने चेंडू टाकला, जो हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. असे असले, तरी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या म्हणण्याप्रमाणे टी-२० क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही. गोलंदाजाने योग्य टप्प्यावर चेंडू टाकणे देखील तितकेच गरजेचे आहे. उमरानने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात रविवारी अवघी दोन षटके गोलंदाजी केली, पण त्यामध्ये २५ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेतली नाही. त्याच्या या खराब प्रदर्शनानंतर शास्त्री त्यांचे मत मांडले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माध्यमांशी बोलताना शास्त्री म्हणाले की, “तो लवकरच भारतासाठी खेळेल. त्याची गती चांगली आहे, पण तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, विकेट घेण्यासाठी तुम्हाला योग्य एरियामध्ये गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजाला आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न कमीत कमी केला पाहिजे. असे विचार तुमच्या डोक्यातून निघून गेले पाहिजेत. येत्या काळात खेळपट्टी गोलंदाजीसाठी अधिक अनुकूल होईल. मी प्रत्येक ठिकाणी मीडियाला सांगत असतो की, १५६-१५७ ची गती टी-२० प्रकारात महत्वाची नसते. तुम्हाला योग्य क्षेत्रात गोलंदाजी करावी लागेल.”
दरम्यान, आरसीबीविरुद्धच्या सामन्यात उमरानने टाकलेल्या पहिल्या षटकात २०, तर दुसऱ्या षटकात ५ धावा खर्च केल्या. या दोन षटकांनंतर हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने उमरानला तिसरे षटक टाकण्याची संधी दिली नाही. उमरानने गुजरात टायटन्सविरुद्ध २६ एप्रिल रोजी खेळलेल्या सामन्यात २५ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु त्यानंतर मागच्या तीन सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. यादरम्यान, त्याने सीएसकेविरुद्ध ४८, तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५२ धावा खर्च केल्या होत्या आणि या दोन्ही सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नव्हता. चालू हंगामात त्याने आतापर्यंत २४.२६च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत सातव्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो’ काय सुपरमॅन नाहीये, जो नेहमीच विजय मिळवून देईल, म्हणत शास्त्रींची कोलकाता संघावर आगपाखड
फलंदाजी करण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये बॅट खाताना दिसला धोनी, असे का करतो थाला? घ्या जाणून
मास्टर धोनीचा सल्ला ऐकून सीएसकेच्या तोडफोड मंडळाचा अध्यक्ष बनलाय कॉन्वे, स्वत: केला खुलासा