नुकतीच आयपीएल २०२१ स्पर्धा संपन्न झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने बाजी मारली, तर आयपीएल २०२२ स्पर्धेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आगामी हंगाम थोडा वेगळा असणार आहे. कारण या स्पर्धेसाठी अहमदाबाद आणि लखनऊ या दोन्ही नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूंचा मेगा लिलाव घेण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) रिटेन पॉलिसीची घोषणा केली होती. आता या पॉलिसीबाबत आणखी मोठी माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयने दोन नवीन संघांसह सर्व १० संघांना लिलावात ९० कोटी रुपये खर्च करण्याची मुभा दिली आहे. जुने ८ संघ प्रत्येकी जास्तीत जास्त ४ खेळाडूंना रिटेन करू शकतील. तर या ८ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर उर्वरित २ संघांना ३-३ खेळाडू घेण्याची संधी दिली जाणार आहे.
आयपीएल फ्रेंचायजीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “बीसीसीआयने सर्व फ्रेंचायजीला पत्र लिहिले होते. ज्यामध्ये सर्व नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, जर ४ खेळाडूंना रिटेन केले तर संघाला फक्त ४२ कोटी रुपये खर्च करावे लागतील. तर ३ खेळाडूंना रिटेन केल्यास, ३३ कोटी रुपये खर्च करावे लागतील. तसेच २ खेळाडूंना जर रिटेन केले तर ९० कोटींपैकी २४ कोटी आणि १ खेळाडूला रिटेन केल्यास १४ कोटी रुपये खर्च करावे लागतील.”
तसेच अधिकाऱ्याने पुढे म्हटले की, “समजा जर, दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या ४ खेळाडूंपैकी रिषभ पंतला रिटेन केले. तर त्यांच्या खात्यातून १६ कोटी रुपये कापले जातील. परंतु प्रत्यक्षात रिषभ पंतला तितकीच रक्कम मिळेल असे काही नाही. ती रक्कम कमी देखील असू शकते. मी फक्त एक उदाहरण देत आहे.”
रिटेन पॉलिसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, फ्रेंचायजी ४ खेळाडूंना रिटेन करू शकतील, ज्यामध्ये ३ भारतीय आणि १ परदेशी खेळाडू किंवा २ भारतीय आणि २ परदेशी खेळाडूंचा समावेश असू शकतो. या पत्रामध्ये असे देखील म्हटले गेले आहे मी नोव्हेंबर महिन्यात फ्रेंचायजींना खेळाडू रिटेन करण्याची संधी दिली जाणार आहे. तर २५ डिसेंबरपर्यंत लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांना ३ -३ खेळाडूंची निवड करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात लिलाव सोहळा पार पडणार आहे.
जर कुठल्या संघाला ४ खेळाडूंना रिटेन करायचे असेल तर, पहिल्या खेळाडूची किंमत १६ कोटी, दुसऱ्या खेळाडूची किंमत १२ कोटी, तिसऱ्या खेळाडूची किंमत ८ कोटी आणि चौथ्या खेळाडूची किंमत ६ कोटी रुपये असेल. अशाप्रकारे फ्रेंचायजीचे ४२ कोटी कापले जातील आणि फ्रेंचायजी ४८ कोटीसह लिलावात उतरेल. तर ३ खेळाडूंना रिटेन केल्यास ही किंमत १५ कोटी, ८ कोटी आणि ७ कोटी इतकी असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा विश्वविक्रम, बनला एका वर्षात सर्वाधिक टी२० विकेट्स घेणारा गोलंदाज
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
नामिबियाविरुद्ध पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल अफगानिस्तान, असगर अफगानचा असेल निरोप सामना






