लवकरच भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा थरार रंगणार होणार आहे. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (३० नोव्हेंबर) जुन्या ८ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे अधिकृतपणे जाहीर केली आहेत. आयपीएलचे एकही जेतेपद न मिळवू शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने येत्या हंगामासाठी ३ खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये विराट कोहलीसहित मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश आहे.
यानंतर आरसीबीचा माजी कर्णधार विराट यांच्या रिटेंशनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण विराटने आपल्या आयपीएलमधील पगारात कपात करत आरसीबी संघात कायम राहण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आरसीबीची अव्वल पसंती असूनही विराटने २०१८ मध्ये मिळालेल्या १७ कोटींच्या कराराऐवजी यंदा १५ कोटींमध्ये संघात कायम राहण्याचे ठरवले आहे. संघाच्या हिताचा विचार करत त्याने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. आरसीबीचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
विराटने संघाच्या हिताचासाठी केली पगारात कपात
पार्थिव पटेल यासंदर्भात बोलताना म्हणाला की, “मला वाटते की त्याने संघाच्या मोठ्या हितासाठी आपल्या वेतनात कपात केली आहे. जर त्याने १७ कोटी घेतले असते तर वरील २ कोटी त्याच्याच खिशात पडले असते. अर्थात आरसीबीकडे मेगा लिलावासाठी २ कोटींची वजनदार रक्कम कमी पडली असती. त्यामुळे संघाच्या फायद्याचा विचार करत हा निर्णय घेतला आहे आणि हा अगदी योग्य निर्णय आहे.”
आरसीबीच्या खिश्यात उरले ५७ कोटी
आरसीबीने रिटेंशन प्रक्रियेत त्यांचा माजी कर्णधार आणि ‘रनमशीन’ म्हणून ओखळला जाणारा विराट याला येत्या हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. त्यांनी १५ कोटी खर्च करत विराटला ताफ्यात घेतले आहे. विराटबरोबर त्याचा लाडका शिलेदार म्हटला जाणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही ७ कोटींची रक्कम मोजत संघात कायम ठेवण्यात आले आहे. तर परदेशी खेळाडूच्या रुपात विस्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला घेतले गेले आहे. त्याच्यासाठी आरसीबीने ११ कोटींची किंमत मोजली आहे. यानंतर आता आरसीबीच्या खिश्यात ५७ कोटी उरले असून ही रक्कम येत्या मेगा लिलावासाठी वापरली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
केवळ पैशासाठी नाते तोडून गेला राशिद? काय घडले सनरायझर्सच्या गोटात? वाचा सविस्तर
विराटने घेतली शपथ; म्हणाला, ‘आरसीबीसोबत पुढील ३ वर्षे घालवायची आहेत, अजून माझं बेस्ट देणं बाकी आहे’
राहुलला रिलीज करण्यामागचं कारण आले समोर; प्रशिक्षक कुंबळेंचा धक्कादायक खुलासा