राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आयपीएल २०२२मध्ये समाधानकारक प्रदर्शन करत आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान संघानेही चांगले प्रदर्शन केले आहे. सोमवारी (२ मे) त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अर्धशतकी खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सॅमसन नुकताच काही दिवसांपूर्वी ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमात उपस्थित राहिला होता. यावेळी त्याने त्याच्या कारकिर्दीतील एका निराशाजनक प्रसंगाचा खुलासा केला.
संजू सॅमसन (Sanju Samson) खूप कमी वयात भारतीय संघासाठी पदार्पण करण्यात यशस्वी झाला होता, पण त्यानंतर पुढच्या मोठ्या काळासाठी त्याला संघातून बाहेर ठेवले गेले. संघातून बाहेर असलेल्या पाच वर्षात त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यादरम्यान एकदा त्याला केरळच्या संघातून देखील बाहेर केले गेले होते. सॅमसनसाठी हे सर्व प्रसंग खूपच कठीण ठरले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ कार्यक्रमात बोलताना संजू म्हणाला की, “मी भारतासाठी पदार्पण केले, तेव्हा माझे वय १९ किंवा २० वर्ष होते. नंतर मी २५ वर्षाचा असताता मला पुन्हा राष्ट्रीय संघात संधी मिळाली. ते पाच वर्ष माझ्यासाठी खूप आव्हानात्मक राहिले. मी केरळच्या संघातून देखील जागा गमावली होती. अशात तुम्ही स्वतःवर खूप शंका करू लागता. माझ्या मनात हेच चालू होते की, संजू तू पुनरागमन करू शकतो. जर तुम्ही खरे आणि प्रामाणिक असाल, तर या गोष्टींमधून जाता.”
सॅमसनने एकदा राग आल्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये आवडती बॅट तोडली होती. याविषयी बोलताना तो म्हणाला, “मी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळत होतो. बाद झाल्यानंतर मी ड्रेसिंग रूममध्ये परतलो. तिथे माझी बॅट मोडली आणि स्टेडियमच्या बाहेर निघून गेलो, तेव्हा सामना सुरू होता. मी विचार करत होतो की, क्रिकेट सोडून घरी बसावं, मी केरळला परत जातो.”
“मी मरीन ड्राईव्हला गेलो आणि समुद्राकडे पाहू लागलो. मी विचार करत होतो की, अखेर हे काय सुरू आहे. मी त्याठिकाणी जवळपास तीन-चार तास बसलो. नंतर रात्री परत आलो. मी माझ्या बॅटकडे पाहिले. ती खूप चांगली बॅट होती. तिला तोडल्यानंतर मला खूप वाईट वाटले. मी विचार करत होतो की, मी बॅट उशीवर मारली असती, तर बरे झाले असते, ती तुटली नसती,” असे सॅमसनने पुढे बोलताना सांगितले.
दरम्यान, आयपीएल २०२२मध्ये संजू सॅमसन त्याच्या प्रदर्शनात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे आणि सॅमसनला यासाठी भारतीय संघात स्थान बनवणे महत्वाचे आहे. चालू हंगामात त्याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने सुरुवातीच्या १० सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयपीएल २०२२च्या प्लेऑफ आणि महिला टी२० चॅलेंज सामन्यांचे वेळापत्रक जाहीर