इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) स्पर्धेचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये अधिक रोमांचक सामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघांमध्ये आगामी हंगामात ८ ऐवजी १० संघ मैदानात दिसणार आहेत. या १० संघांमध्ये काही गोलंदाज असे आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आहेत. आपण या लेखात आयपीएल २०२२ मध्ये खेळणाऱ्या अशा गोलंदाजांवर नजर टाकू, जे डावच्या सुरावतीच्या षटकांमध्ये विरोधी संघासाठी घातक ठरू शकतात.
दीपक चाहर –
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. तो सुरुवातीच्या षटकांमध्ये फक्त धावांवर अंकुश लावण्याचे काम करत नाही, तर महत्वाच्या विकेट्सही घेऊ शकतो. संघासाठी किफायशीर ठरणाऱ्या गोलंदाजांमध्ये चाहरची गणना केली जाते. याच कारणास्तव सीएसकेने त्याला खरेदी करण्यासाठी मेगा लिलावात तब्बल १४ कोटी रुपये खर्च केले. परंतु तो सध्या दुखापतीतून सावरत असल्यामुळे आगामी हंगामातील आर्ध्यापेक्षा जास्त सामन्यांमध्ये तो न खेळण्याची शक्यता आहे.
जसप्रीत बुमराह –
त्याच्या यॉर्कर चेंडूमुळे प्रसिद्धी मिळवलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील नवीन चेंडूसह अधिक घातक गोलंदाजी प्रदर्शन करू शकतो. त्याच्या या प्रदर्शनामुळेच मुंबई इंडियन्सने त्याला संघात रिटेन केले होते. त्याने मुंबई इंडियन्ससाठी अनेक सामन्यांमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आहे आणि संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएल २०२१ मध्ये बुमराहने तब्बल २१ विकेट्स घेतल्या होत्या.
हर्षल पटेल –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) देखील नवीन चेंडून विकेट्स घेऊ शकतो. मागच्या आयपीएल हंगामात त्याची गोलंदाजी आरसीबीसाठी फायदेशीर ठरली होती. त्याने आयपीएल २०२१ मध्ये सर्वात जास्त ३२ विकेट्स घेतल्या होत्या. आरसीबीने हर्षलला रिटेन केले नव्हते, परंतु मेगा लिलावात मात्र त्याला हातातून जाऊ दिले नाही. मेगा लिलावात आरसीबीने त्याच्यासाठी १०.७५ कोटी रुपये खर्च केले.
आवेश खान –
आवेश खान (Avesh Khan) मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत होता, पण आगामी हंगामात लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. नवीन चेंडूसोबत त्याचे प्रदर्शन अधिक चांगले असते आणि फलंदाजाची विकेट घेणे सोपे होऊन बसते. त्याने आयपीएमध्ये २४ विकेट्स घेतल्या आहेत. लखनऊने आवेशचे दमदार प्रदर्शन लक्षात घेऊन मेगा लिलावात त्याच्यासाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च केले.
जोश हेजलवुड –
जोश हेजलवुड (Josh Hazlewood) मध्येही नवीन चेंडूने विकेट घेण्याची गुणवत्ता आहे. मागच्या वर्षी तो सीएसकेसाठी खेळला होता, पण आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. तो कोणत्याही खेळपट्टीवर नवीन चेंडूसह चांगले प्रदर्शन करून दाखवू शकतो. मागच्या हंगामात त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी ११ विकेट्स घेतल्या होत्या, पण आगामी हंगामात आरसीबीसाठी सुरुवातीच्या षटकांमध्ये कमाल करून दाखवू शकतो.