इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील १८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये खेळला गेला. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईला बेंगलोरने ७ विकेट्सने पराभूत केले. आरसीबीचा आयपीएल २०२२ मधील हा तिसरा विजय आहे, तर मुंबईला आत्तापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात अपयश आले आहे. दरम्यान, या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात ३६ चेंडूत ४८ धावा केल्या, ज्यामध्ये ५ चौकारांचा देखील समावेश आहे. त्याने दूसऱ्या विकेटसाठी अनुज रावतसोबत ८० धावांची भागीदारी केली. विराटने या सोबतच आयपीएलमधील आपले ५५० चौकार पूर्ण केले आहेत. तो या लीगमध्ये ५५० हून अधिक चौकार आणि २०० हून अधिक षटकार लगावणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. विराटने २११ आयपीएल सामन्यांमध्ये ५५४ चौकार, तर २१२ षटकार ठोकले आहेत. तसेच त्याने ५ शतके आणि ४२ अर्धशतके देखील ठोकली आहेत.
विराटने आयपीएलच्या १४ व्या हंगामातील ४ सामन्यात त्याने एकदाही अर्धशतकीय खेळी खेळली नाही. त्याने पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध ४१ धावा केल्या. नंतर केकेआरविरुद्ध १२, तर राजस्थानविरुद्ध ५ धावा केल्या. तसेच मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने ४८ धावा केल्या.
विराट हा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू ठरला आहे. त्याने या लीगमध्ये ३७ च्या सरासरीने ६३८९ धावा केल्या आहेत. इतर फलंदाजांनी अजून ६ हजारचा आकडा देखील गाठलेला नाही. तो ३२ वेळा नाबाद देखील राहिला आहे.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमसुद्धा विराटच्याच नावावर आहे. त्याने २०१६ च्या हंगामात ८१ च्या सरासरीने ९७३ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये ४ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ११ सामन्यांत ५० हून अधिक धावा केल्या होत्या, परंतु या दरम्यान आरसीबी संघ अंतिम सामन्यात येऊन पराभूत झाला होता. आरसीबीने आयपीएल इतिहासात एकदाही विजेतेपद पटकावले नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
इकडं धोनी ३६० डिग्री फिरला, अन् तिकडं चाहत्यानं पकडलं डोकं; व्हिडिओ जोरदार व्हायरल