इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळे आयपीएल २०२२ हंगामात खेळू शकणार नाहीय. आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेली फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वुडसाठी मेगा लिलावात ७.५ कोटी रुपये खर्च केले होते. आता अशी माहिती समोर येत आहे की, मार्क वुडच्या जागी लखनऊ संघाने झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी याच्याशी करार केला आहे. झिम्बाब्वेतील भारतीय राजदूताने याविषयी माहिती दिली आहे.
आयपीएमध्ये ब्लेसिंग मुजरबानी (Blessing Muzarabani) याच्या रूपात आठ वर्षांनंतर एखादा झिम्बाब्वेचा खेळाडू सहभागी होणार आहे. यापूर्वी झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलर आयपीएलमध्ये खेळतो होता. तो सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू होता आणि संघाने त्याला २०१५ हंगामापूर्वी रिलीज केले होते. टेलर व्यतिरिक्त झिम्बाब्वेचा रे प्राइस मुंबई इंडियन्ससाठी आणि टेटेंडा टाइबू केकेआरसाठी खेळले होते.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) आयपीएल २०२२ साठी लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळणार होता. परंतु वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. याच कारणास्तव तो आगामी आयपीएल हंगामात सहभागी होऊ शकणार नाही. झिम्बाब्वेच्या भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करून ब्लेसिंग मुजरबानी आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Ambassador met with Mr Blessing Muzarabani, the Zimbabwean bowler, as he prepared to leave for #IPL2022.
Ambassador wished him & his team #LucknowSuperGiants the very best. #IndiaAt75 @IndianDiplomacy @MEAIndia @iccr_hq pic.twitter.com/8AMPO9Xbyd
— India in Zimbabwe (@IndiainZimbabwe) March 21, 2022
झिम्बाब्वेतील भारतीय दूतावासाने जरी याविषयी माहिती दिली असली, तर एक गोष्ट अस्पष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे मुजरबानीला लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वुडच्या जागी संघात संधी दिली आहे की, त्याला नेट गोलंदाजाच्या रूपात संधी दिली केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सनेही याविषयी अद्याप कसलीही अधिकृत घोषणा केलेली नाहीय. बांगलादेशच्या तस्कीन अहमदलाही लखनऊकडून खेळण्यासाठी प्रस्ताव दिला गेला होता. परंतु आयपीएलदरम्यान बांगलादेशचे वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे बीसीबीने त्याला भारतात जाण्याची परवानगी दिली नाही.