आयपीएल 2023 मध्ये दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी (4 एप्रिल) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स असा सामना खेळला गेला. हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी घरच्या मैदानावर उतरलेल्या दिल्लीला पुन्हा एकदा विजयी रेषेपार जाण्यात अपयश आले. गतविजेत्या गुजरातने उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन करत 6 गडी राखून विजय मिळवला.
Match 7. Gujarat Titans Won by 6 Wicket(s) https://t.co/tcVIlEJ3bC #TATAIPL #DCvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
आपले घरचे मैदान असलेल्या अरूण जेटली स्टेडियमवर हंगामातील पहिला सामना खेळत असलेल्या दिल्लीला या सामन्यात अपेक्षित फलंदाजी करता आली नाही. नाणेफेक गमावल्यानंतर दिल्लीला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने 37 व सर्फराजने 30 धावा केल्या. मात्र, त्यांना धावांची अपेक्षित गती राखता आली नव्हती. अष्टपैलू अक्षर पटेल याने फलंदाजीला येत आक्रमक 36 धावा केल्या. युवा अभिषेक पोरेलने 20 धावांचे योगदान दिले. गुजरात संघासाठी शमी व राशीद खान यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात देखील फारशी चांगली नव्हती. गुजरातचे दोन्ही सलामीवीर वृद्धिमान साहा व शुबमन गिल यांच्यासह कर्णधार हार्दिक पंड्या पावर प्ले मध्येच तंबूत परतला. संघ अडचणीत असताना तमिळनाडूसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक भागीदाऱ्या केलेले साई सुदर्शन व विजय शंकर हे संघाच्या मदतीला धावून आले. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. शंकर 29 धावा करत माघारी परतल्यानंतर, हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या डेव्हिड मिलरने आपला दर्जा दाखवला. त्याने फटकेबाजी करत संघाचा विजय जवळ आणला. दरम्यान सुदर्शनने स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. अखेर या दोघांनी संघाचा विजय साकार केला.
(IPL 2023 Gujarat Titans Beat Delhi Capitals By 6 Wickets Rashid Shami Sai Sudarshan Shines)