इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा 39वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 6 गडी राखून पराभव केला.
चेन्नईनं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 210 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सनं हे लक्ष्य 19.3 षटकांत 4 गडी गमावून गाठलं. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसनं शानदार फलंदाजी केली. तो 63 चेंडूत 124 धावा करून नाबाद राहिला. त्यानं 13 चौकार आणि 6 षटकार लगावले. दीपक हुड्डानं 6 चेंडूत महत्त्वाच्या 17 धावा ठोकल्या.
क्विंटन डी कॉक आज काही कमाल करू शकला नाही. तो शून्यावर तंबूत परतला. दीपक चहरनं त्याची विकेट घेतली. कर्णधार केएल राहुल 14 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. मुस्तफिजूरनं त्याची विकेट घेतली. निकोलस पूरनं 15 चेंडूत धडाकेबाज 34 धावा ठोकून बाद झाला. पाथीराननं त्याला शार्दुल ठाकूरच्या हाती झेलबाद केलं.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर अजिंक्य रहाणे पहिल्याच षटकात बाद झाला. तो 3 चेंडूत 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅट हेन्रीनं त्याची विकेट घेतली. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडनं शानदार शतक ठोकलं. तो 60 चेंडूत 108 धावा करून नाबाद राहिला. त्यानं 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
शिवम दुबेनं 27 चेंडूत झंझावाती 66 धावा ठोकल्या. दुबेनं 3 चौकार आणि 7 षटकार लगावले. दुबे आणि गायकवाडमध्ये 47 चेंडूत 104 धावांची भागीदारी झाली. डॅरिल मिशेल 10 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. तर रवींद्र जडेजानं 19 चेंडूत 16 धावांचं योगदान दिलं. लखनऊकडून मॅट हेन्री, मोहसिन खान आणि यश ठाकूरनं प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर
इम्पॅक्ट प्लेअर्स – देवदत्त पडिक्कल, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग चरक, मणिमरण सिद्धार्थ
चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर
महत्त्वाच्या बातम्या –
अंपायरच्या निर्णयावर नाखूष केएल राहुलचा संयम सुटला, मैदानावरच घातला वाद
चेन्नईचा वाघ, ऋतुराज गायकवाड! लखनऊच्या गोलंदाजांना धो-धो धुतलं, घरच्या मैदानावर ठोकलं झंझावाती शतक